मुंबई : सागरी किनारा मार्गावरील हाजीअली ते वरळीपर्यंतची वाहतूक सुरू केल्यापासून वरळीतील वाहतूक कोंडी कमी होण्याऐवजी वाढली आहे. पहिल्याच दिवशी वरळी सी फेस परिसरात वाहनाच्या रांगा लागल्याचे निदर्शनास आले होते. तर शुक्रवारी सकाळी दक्षिणेकडे जाणाऱ्या मार्गावर बोगद्यामध्ये वाहतूक कोंडी झाल्यामुळे लोकप्रतिनिधींची वाहने अडकली होती.

धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील हाजी अली ते वरळीपर्यंतचा साडेतीन किमीचा टप्पा गुरुवारपासून सुरू करण्यात आला. हा टप्पा सुरू केल्यामुळे वरळीतील वाहतूक कोंडी कमी होईल असा अंदाज वतर्वला जात होता. मात्र पहिल्याच दिवशी गुरुवारी संध्याकाळनंतर वरळी परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. वरळी सीफेस परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अर्धा ते पाऊण तास वाहने एकाच जागी अडकून पडली होती, अशी तक्रार वाहनचालकांनी समाज माध्यमांवर केली आहे. सागरी किनारा मार्ग हा पुढे वांद्रे – वरळी सागरी सेतूला जोडला जाणार आहे. मात्र अद्याप हे दोन मार्ग जोडलेले नसल्यामुळे दक्षिण मुंबईतून सागरी किनारा मार्गावरून सुसाट येणारी वाहने वरळीत येऊन अडकून पडत असल्याची खंत वाहनचालकांनी व्यक्त केली.

हेही वाचा : आषाढीनिमित्त एसटी प्रवाशांना सवलती लागू

गुरुवारी रात्री उशीरापर्यंत वरळी परिसरात ही वाहतूक कोंडी असताना शुक्रवारी सकाळी सागरी किनारा मार्गावरील दक्षिण वाहिनीवरही वाहतूक कोंडी झाली होती. या ठिकाणी वाहतूक सिग्नल बंद पडल्यामुळे ही वाहतूक कोंडी झाल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तर मोटारगाडीतील बिघाडामुळे ही वाहतूक कोंडी झाल्याचे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे.

हेही वाचा : एकदा भूमिपूजन केलेल्या प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते पुन्हा भूमिपूजन, गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्पावरून आदित्य ठाकरे यांचा टोला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सागरी किनारा मार्गावर दुचाकी

सागरी किनारा मार्गावरून सर्व प्रकारच्या दुचाकींना प्रवेशास मनाई आहे. मात्र या मार्गावरून गुरुवारी एक दुचाकीस्वार जातानाची ध्वनीचित्रफित समाजमाध्यमांवर टाकण्यात आली आहे. सागरी किनारा मार्गाच्या बोगद्यातील ही ध्वनिचित्रफित आहे. यामुळे सागरी किनारा मार्गावरील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.