मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा नियोजनातील गोंधळाने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. कला शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या (बीए) परीक्षा उद्यापासून सुरू होणार आहेत. मात्र अद्यापही विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे (हॉल तिकीट) मिळालेली नाहीत. परिक्षापूर्व तयारी न झाल्यामुळे बीएमएमच्या परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढवली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या कारभारात कुणाचा कुणाला पायपोस राहिला नसल्याचे दिसत आहे. निकाल रखडणे, प्रश्नपत्रिका पाठवण्यात चुका अशा परीक्षा विभागाच्या कारभारापुढे विद्यार्थी, महाविद्यालये, प्राध्यापक हतबल झाले आहेत. विद्यापीठाच्या कला पदवीच्या सहाव्या सत्राच्या परीक्षा बुधवारपासून (१२ एप्रिल) सुरू होणार आहेत. मात्र त्याची प्रवेशपत्रे अद्यापही विद्यार्थ्यांना मिळालेली नाहीत.
हेही वाचा…. अभिनेता सलमान खानला धमकी प्रकरण; ठाण्यातील शहापूरमधून अल्पवयीन मुलगा ताब्यात
अनेक विद्यार्थ्यांना पाचव्या सत्राचा निकालही मिळालेला नाही. त्यातच बुधवारपासून नियोजित असलेल्या बीएमएमच्या परीक्षा अचानक पुढे ढकलण्यात आल्याचे संदेश विद्यार्थ्यांना मिळाले आहेत. त्यामुळे विद्यार्थी गोंधळले आहेत. याबाबत युवासेना आणि मनविसेच्या अधिसभा सदस्यांनी विद्यापीठाकडे तक्रार केली आहे.