मुंबई : चेंबूर, अमर महल जंक्शन – सांताक्रुझ, पश्चिम द्रुतगती महामार्ग प्रवास लवकरच केवळ ३० ते ३५ मिनिटांत करणे शक्य होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता प्रकल्पाच्या विस्तारीकरणाअंतर्गत बांधण्यात येत असलेल्या वाकोला नाला – पानबाई शाळा, सांताक्रुझ उन्नत रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहेर या उन्नत रस्त्यातील केबल स्टे पुलाचे १०० टक्के काम पूर्ण झाले आहे.

उर्वरित कामे येत्या काही दिवसांत पूर्ण करून हा उन्नत रस्ता लवकरच वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. हा उन्नत रस्ता वाहतूक सेवेत दाखल झाल्यास अमर महल जंक्शन – सांताक्रुझ, पश्चिम द्रुतगती महामार्ग प्रवास थेट आणि सिग्नलमुक्त होणार आहे. तर वाकोला, सांताक्रुझ, अंधेरी येथील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील अंतर कमी करण्यासाठी एमएमआरडीए सांताक्रुझ – चेंबूर जोडरस्ता बांधत आहे. या जोडरस्त्याद्वारे कुर्ल्यावरून बीकेसीला आणि वाकोल्यावरून पश्चिम द्रुतगती मार्गावर अतिजलद जाता यावे यासाठी सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता प्रकल्पाचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कपाडिया नगर ते वाकोला दरम्यान ३.०६ किमी लांबीचा उन्नत रस्ता बांधण्याचे काम हाती घेण्यात आले. यातील कपाडिया नगर ते वाकोला नाला प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून हा उन्नत रस्ता वाहतूक सेवेत दाखल आहे. मात्र यातील दोन मार्गिकांच्या वाकोला नाला ते पानबाई शाळा अशा १.०२ किमी लांबीच्या उन्नत रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.

आतापर्यंत हा उन्नत रस्ता वाहतूक सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र काम संथगतीने सुरू असल्याने आणि यातील केबल स्टे पुलाचे काम आव्हानात्मक असल्याने विलंब झाला. कामास विलंब झाल्याप्रकरणी कंत्राटदाराविरोधात एमएमआरडीएने दंडात्मक कारवाईही केली होती. पण आता मात्र या उन्नत रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असून केबल स्टे पुलाचे १०० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती एमएमआरडीएने दिली आहे. महानगर आयुक्त डाॅ संजय मुखर्जी यांनी बुधवारी प्रकल्पस्थळास भेट देत कामाचा आढावा घेतला.

वाकोला नाला ते पानबाई शाळा उन्नत रस्ता प्रकल्पात देशातील पहिला १०० मीटर तीव्र वळणाचा केबल स्टे पूल बांधण्यात आला आहे. २१५ मीटर लांबीच्या ऑर्थोट्राॅपिक स्टील डेकचा समावेश असलेला हा पूल आहे. तर पश्चिम द्रुतगती मार्गावरील उड्डाणपुलावरून हा पूल गेला आहे. या पुलाची उंची जमिनीपासून २५ मीटर आहे. या पुलाचे १०० टक्के काम पूर्ण झाले आहे. तर उन्नत रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. सध्या सूचना फलक लावणे, केबल स्टे पुलाखालील तात्पुरते आधार काढणे, रंगरंगोटी, सौंदर्यीकरण, पथदिवे आणि इतर प्रकारची कामे सुरू आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही कामे लवकरात लवकर पूर्ण करून हा उन्नत रस्ता वाहतूक सेवेत दाखल करण्याचे नियोजन असल्याचे मुखर्जी यांनी सांगितले. तर हा उन्नत रस्ता सुरू झाल्यास प्रवाशांचा प्रवास अतिजलद होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, हा उन्नत रस्ता वाहतूक सेवेत दाखल करण्यासाठी निश्चित अशी तारीख एमएमआरडीएकडून देण्यात आलेली नाही. मात्र जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत हा रस्ता वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.