मुंबई : सायबर भामट्यांनी फसवणुकीसाठी आता मधुजालाचा (हनी ट्रॅप) वापर करण्यास सुरुवात केली आहे. अंधेरीतील एका तरुणाला विवाहविषयक संकेतस्थळावरून जाळ्यात अडकवून फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. एका तरुणीने त्या तरुणाला लग्नासाठी मागणी घातली आणि आपल्या मधुजालात अडकवले. फिर्यादीला आभासी चलनात (क्रिप्टो करन्सी) गुंतवणूक करण्यास भाग पाडून ३२ लाखांची आर्थिक फसवणूक केली.
फिर्यादी २९ वर्षांचे असून अंधेरीत राहतात. एका बहुराष्ट्रीय कंपनीत ते व्यवस्थापक म्हणून काम करतात. त्यांनी लग्नासाठी एका विवाहविषयक संकेतस्थळावर नाव नोंदवले होते. त्यांना २१ एप्रिल २०२५ रोजी माही अग्रवाल नामक तरुणीने प्रतिसाद दिला. माही फिर्यादीच्या समाजाची आणि त्याच्याच राज्यातील होती. आपण मलेशियामधील बुस्ट बेस नामक कंपनीत क्रिप्टो करंसी इन्व्हेस्टर म्हणून काम करीत असल्याचे तिने सांगितले. तिला चांगला पगार होता. फिर्यादीला हे स्थळ आवडले. मुलगी दिसायला सुंदर होती आणि तिला परदेशात चांगली नोकरी होती. त्यामुळे फिर्यादीने तिला होकार दिला. त्याने याबाबत आपल्या कुटुंबियांना कळवले. त्यानंतर दोघांनी आपापले मोबाइल क्रमांक परस्परांना दिले. मात्र प्रत्यक्षात माही अग्रवाल या तरुणीने फसवणुकीसाठी रचलेला तो सापळा होता. ती फिर्यादीला मोहजालात अडकवू लागली.
सुरवातीला लग्न, देवाण घेवाण, भविष्यातील संसार आदींबाबत गोड गप्पा सुरू झाल्या. त्यावेळी माहीने फिर्यादीला क्रिप्टो करंसीबाबत (आभासी चलन) माहिती देऊन गुंतवणुकीचा सल्ला दिला. मात्र फिर्यादीला हा प्रकार माहीत नव्हता. माहीने त्याला आपल्या मधाळ बोलण्याने वारंवार पाठपुरावा करून क्रिप्टो करंसीमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. अखेर फिर्यादी तिच्या जाळ्यात अडकला आणि तो गुंतवणुकीसाठी तयार झाला.
तिच्या सांगण्यानुसार फिर्यादीने कुकॉईन या एक्सेंजवर खाते उघडले. त्यानंतर बुस्ट बेस नावाचे ॲप डाऊनलोड केले. त्याने या ॲपवर भारतीय चलनातील सुमारे ३३ लाख रुपये गुंतवले. त्याने१८ मे रोजी पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता ते मिळाले नाहीत. त्यावेळी आपली फसवूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मुंबई सायबर पोलिसांच्या पश्चिम विभागात माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ (ड), भारतीय न्याय संहितेच्या ३१८ (४), ३१९ (२), ३३६ (२), ३३६ (३), ३३८, ३४० (२), ६१ (२) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
सायबर भामटे वेगवेगळ्या प्रकारे नागरिकांची फसवणूक करीत आहेत. विवाहविषयक संकेतस्थळाचा गैरवापर करून ते तरुण-तरुणींना मधुजालात (हनी ट्रॅप) अडकवतात आणि त्यांची फसवणूक करतात, असे सायबर पोलिसांनी सांगितले. विवाहविषयक संकेतस्थळावर केवळ तरूणींचीच नाही तर तरुणांचीही फसवणूक होत आहे. त्यामुळे अशा संकेतस्थळावरील व्यक्तींची माहिती तपासून घ्यावी, आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.