रत्नागिरी : उन्हाळी सुट्टी सुरु झाल्याने चाकरमान्यांनी कोकणची वाट धरल्याने कोकण रेल्वे हाऊस फुल्ल झाली आहे. कोकणाकडे येणा-या अनेक गाड्या मोठ्या प्रमाणावर भरुन येत असल्याने कोकणातील सर्वच रेल्वे स्थानके आणि मुंबई रेल्वे स्थानकांवर चाकरमान्यांची मोठी गर्दी दिसत आहे.
कोकण रेल्वे मार्गावर धावणा-या रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने अनेक चाकरमान्यांचे चांगलेच हाल होत आहेत. येत्या १७ मे पर्यंत सर्व गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. मागील वर्षीच्या मानाने कोंकण रेल्वेच्या उन्हाळी विशेष गाड्या कमी असल्याने चाकरमान्यांना आता एसटी आणि खाजगी बसचा आधार घ्यावा लागत आहे. तसेच काही चाकरमानी स्वत:च्या खाजगी वाहनाने कोकण गाठल्याने मुंबई गोवा महामार्गावरील काही ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत.
कोकण रेल्वे आणि एसटी गाड्याचे आरक्षण उपलब्ध होत नसल्याने अनेकांनी खासगी ट्रव्हल्सचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र खासगी ट्रव्हल्सवाले चाकरमान्यांच्या गरजेचा फायदा उठवीत असल्याने ७०० रुपये भाडे असलेल्या ठिकाणचे १००० ते १५०० रुपये भाडे उकळू लागले आहेत.
उन्हाळी सुट्टीत मुंबईकर कोकणातील गावी जाण्यासाठी गर्दी करु लागल्याने आता एसटीच्या देखील आरक्षण केंद्रांबाहेर प्रवाशांच्या रांगा लागल्या आहेत. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता एसटी महामंडळाने ११४ जादा गाड्यांची व्यवस्था केली आहे. मात्र त्यादेखील अपू-या पडू लागल्या आहेत. कोकणाकडे वाढत जाणारी चाकरमान्यांची संख्या लक्षात घेता जादा गाड्यांची व्यवस्था रेल्वे आणि एसटी प्रशासनाने करावी अशी मागणी करण्यात येत आहे.