पश्चिम रेल्वेवरील मोटरमन कॅबमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून त्यामुळे मोटारमन, गार्डच्या हालचालींवर बारीक नजर ठेवणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर अपघातांची कारणमीमांसा करणेही सोपे होणार आहे. मोटरमन गार्डच्या २२६ कॅबमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू झाले असून ते मे २०२३ मध्ये पूर्ण होईल, असा आशावाद पश्चिम रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.

हेही वाचा – बोरिवली दुर्घटना : अन्य तीन धोकादायक इमारती पाडण्यासाठी रहिवाशांना नोटीस ; मुंबई महानगरपालिकेची मुदत आज संपणार

काही वेळा लोकल चालवताना मोटरमनकडून चुका होतात. त्यामुळे अपघातांचा धोका निर्माण होतो. एखाद्या स्थानकात थांबा विसरणे, वेगमर्यादेचे उल्लंघन करणे, लाल सिग्नल असतानाही गाडी पुढे नेणे अशा घटना अधूनमधून घडत असतात. त्यांचे प्रमाण कमी असले तरी त्यामुळे अपघात होऊ शकतात. याप्रकरणांमध्ये संबंधित दोषी कर्मचाऱ्याला शिक्षाही करण्यात येते. अशा घटनांमागील नेमकी कारणे शोधण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. दुर्घटना, अपघातांचे पुरावे उपलब्ध व्हावे, मोटरमन व गार्डकडून यंत्रणा हाताळताना कोणतीही चूक होऊ नये, झालेली चूक त्वरित नियंत्रण कक्ष किंवा अन्य यंत्रणांमार्फत निदर्शनास आणता यावी यासाठी लोकलमधील मोटरमन आणि गार्ड केबीनच्या आत आणि बाहेर सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. सध्या पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात ११३ लोकल असून त्यातील २२६ मोटरमन, गार्ड कॅबमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यासाठी दोन कोटी ८० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

हेही वाचा – २५ वर्षांची मुंबईची सत्ता टिकविण्याचे शिवसेनेपुढे कडवे आव्हान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मध्य रेल्वेच्या लोकलमधील मोटरमन, गार्डच्या केबीनमध्ये सीसी टीव्ही बसविण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. हे कॅमेरे थेट रेल्वे व्यवस्थापन यंत्रणेशी (टीएमएस) जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांना कॅमेराच्या माध्यमातून केबीनमध्ये बारकाईने लक्ष ठेवता येईल. लोकलवर अज्ञाताकडून होणारी दगडफेक, सिग्नलमधील बिघाड, सिग्नलचा नियम तोडणे, तसेच प्रवाशांचा अपघात या कॅमेऱ्यात कैद होईल. त्यामुळे मोटरमन व गार्डशी संवाद साधून लोकलचे पुढील नियोजनही करता येणार आहे.