मुंबई : ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेच्या कामास २०१७ मध्ये सुरुवात करण्यात आली. काम वेगाने सुरू होते. मात्र दरम्यानच्या काळात कारशेडस अन्य काही अडचणी आल्या. त्यामुळे प्रकल्पास विलंब झाला. पण सर्व अडचणींवर मात करून ‘मेट्रो ३’ मार्गिका आता अंतिम टप्प्यात आली आहे. या मार्गिकेतील आरे – बीकेसी टप्पा १ ऑक्टोबर २०२४ मध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्यात आला. तर या मार्गिकेतील बीकेसी – आचार्य अत्रे चौक असा टप्पा २ अ सेवेत दाखल होत असून ही आनंदाची बाब आहे.
आतापर्यंत मुंबईत ५९ किमीच्या मेट्रो मार्गिका कार्यान्वित असून आज त्यात ९ किमीच्या मार्गिकेची भर पडली आहे. तर येत्या दोन वर्षांत आणखी अतिरिक्त १०० किमी लांबीच्या मेट्रो मार्गिका वाहतूक सेवेत दाखल केल्या जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता बीकेसी – आचार्य अत्रे चौक टप्पा २ अचे फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकथान शिंदे यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. लोकार्पण झाले असले तरी सर्वसामान्यांना मात्र या मार्गिकेवरून शनिवारपासून प्रवास करता येणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ३३७ किमी लांबीच्या मेट्रो प्रकल्पातील ३३.५ किमीच्या मेट्रो प्रकल्पाच्या उभारणीची जबाबदारी मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनकडे (एमएमआरसी) आहे. त्यानुसार एमएमआरसीने मागील काही वर्षांपासून या मार्गिकेचे काम सुरू केले असून यापैकी आरे – बीकेसी दरम्यानचा १२.६९ किमीचा टप्पा ऑक्टोबर २०२४ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाला. आता शनिवार १० मेपासून बीकेसी – आचार्य अत्रे चौक मेट्रो मार्गिकेचे संचलन सुरू होणार आहे. त्यामुळे शनिवारपासून मुंबईकरांचा आरे – आचार्य अत्रे चौक, वरळी नाका असा थेट भूयारी, अतिजलद आणि गारेगार मेट्रो प्रवास सुरू होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी या मार्गिकेचे शुक्रवारी लोकार्पण केले असले तरी प्रत्यक्ष मार्गिकेचे संचलन करण्याच्यादृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष ही मार्गिका शनिवार, १० मेपासून सर्वसामान्यांसाठी खुली होणार असल्याचे एमएमआरसीकडून सांगण्यात आले.
गिरगावसारख्या परिसराखालून, मिठीनदी खालून भुयारी मेट्रो मार्गिका नेणे ही अत्यंत आव्हानात्मक आणि कठीण बाब होती. मात्र एमएमआरसीने हे आव्हान यशस्वीपणे पेलल्यामुळे आज मिठी नदीच्या खालून आपल्याला मेट्रोने प्रवास करता येत आहे. हे अभियांत्रिकी कौशल्याचे उत्तम उदाहरण असल्याचे म्हणत फडणवीस यांनी एमएमआरसीच्या कामाचे कौतुक केले. आचार्य अत्रे चौक – कफ परेड टप्पा २ ब ऑगस्टमध्ये सर्वसामान्यांसाठी खुला केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच मेट्रो ३ ला प्रवाशांचा प्रतिसाद वाढत असून संपूर्ण मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्यास प्रतिसाद प्रचंड वाढेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
लवकरच एकात्मिक तिकीट प्रणाली
नागरिकांचा प्रवास सुकर करण्यासाठी मेट्रो, मोनो, बेस्ट बस, रेल्वेसाठी एकच तिकीट वापरता येईल यादृष्टीने एकात्मिक तिकीट प्रणाली लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एकात्मिक तिकीट प्रणालीच्या चचाण्या यशस्वी झाल्या असून लवकरच ही प्रणाली लागू होईल. ही प्रणाली लागू झाल्यास मेट्रो, मोनो, बेस्ट, रेल्वेसाठी एकच तिकीट वापरता येईल – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री