मंगल हनवते

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर ते शिर्डी अंतर केवळ पाच तासात पार करण्याचे प्रवाशांचे स्वप्न ११ डिसेंबरपासून पूर्ण होणार आहे. मात्र नागपूर ते मुंबई असा थेट आठ तासात प्रवास करण्यासाठी आणखी एक वर्ष म्हणजे डिसेंबर २०२३ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. समृद्धी महामार्गाचे जसजसे काम पूर्ण होईल तसतसे टप्प्याटप्प्यात सुरु करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतला आहे. त्यानुसार एकूण चार टप्प्यात महामार्ग सुरू करण्यात येणार असून मे मध्ये नागपूर ते इगतपुरी असा ६२३ किमीचा टप्प्या वाहतूक सेवेत दाखल होणार आहे.

हेही वाचा >>>गुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन; म्हणाले, “भाजपाने मिळवलेला विजय…”

मुंबई ते नागपूर ७०१ किमीच्या समृद्धी महामार्गाच्या कामाला २०१९ ला १६ टप्प्यात सुरुवात झाली. हे काम २०२१ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र करोनाचे संकट आणि इतर कारणाने काम रखडले असून आता ७०१ किमीचा हा महामार्ग वाहतूक सेवेत दाखल करण्यासाठी एमएसआरडीसीने डिसेंबर २०२३ ची मुदत निश्चित केली आहे. २०२१ चा मुहूर्त चुकल्यानंतर मात्र एमएसआरडीसीने कामाला वेग दिला. या महामार्गावरील ७०१ किमीचा टप्पा पूर्ण होण्यासाठी मोठा कालावधी लागणार असल्याने टप्प्याटप्प्यात महामार्ग सुरू करण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला. त्यानुसार मे मध्ये नागपूर ते सेलू बाजार असा २१० किमीचा मार्ग सुरू करण्यात येणार होता. मात्र पूल दुर्घटनेमुळे लोकार्पण सोहळा रद्द करण्यात आला. आता मात्र नागपूर ते शिर्डी अशा ५२० किमीचे काम पूर्ण झाल्याने या टप्प्याचे ११ डिसेंबरला लोकार्पण होणार आहे. लोकार्पणानंतर सर्वसामान्यांसाठी हा महामार्ग खुला होईल आणि कवळ पाच तासात नागपूर ते शिर्डी अंतर पार करता येईल. सध्या हेच अंतर पार करण्यासाठी किमान दहा तास लागतात.

हेही वाचा >>>कन्नडिगांकडून पुन्हा ट्रकला फासलं काळं : आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल; म्हणाले, “घाबरटांनी शिवसेना…”

नागपूर ते शिर्डी टप्पा पूर्ण झाल्यानंतर नागपूर ते सिन्नर असा ५६५ किमीचा महामार्ग फेब्रुवारीअखेरीस तर नागपूर ते भरवीर जंक्शन (सिन्नर-घोटी रस्ता) असा ६०० किमीचा टप्पा मार्चअखेरीस पूर्ण होईल. तसेच नागपूर ते इगतपुरी असा ६२३ किमीचा टप्पा मे अखेरीस पूर्ण करून वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार असल्याची माहिती एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी ‘लोकसत्ता’ दिली. इगतपुरीपर्यंतचा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर उर्वरित ७८ किमीचा टप्पा पूर्ण होण्यासाठी मात्र मे पासून पुढे सहा महिने लागणार आहेत. या टप्प्यात खर्डी येथे दोन किमीचा एक पूल असून तो अत्यंत आव्हानात्मक आहे. या पूलाचे खांब तब्बल ७४ मीटर उंच असणार असून एक टप्पा १४० मीटरचा आहे. हे काम पूर्ण करण्यास जास्त कालावधी लागणार आहे. त्यामुळे नागपूर ते ठाणे (मुंबई) असा ७०१ किमीचा टप्पा डिसेंबर २०२३ अखेरीस पूर्ण होईल असेही गायकवाड यांनी सांगितले. नागपूर येथून सुरू झालेला हा महामार्ग ठाण्यातील आमाणे गावात (शांगरीला रिसॉर्टपासून सहा किमी दूर) येथून येऊन संपणार आहे. त्यानुसार प्रवाशांना डिसेंबर २०२३ पासून ताशी १२० किमी वेगाने आठ तासात प्रवास करता येणार आहे.

लोकार्पणाचे चार टप्पे असे
टप्पा-अंतर (किमी)-लोकार्पण कधी
नागपूर ते शिर्डी-५२० किमी-११ डिसेंबर २०२२
नागपूर ते सिन्नर-५६५ किमी-फेब्रुवारी २०२३
नागपूर ते भरवीर जंक्शन-६००किमी-मार्च २०२३
नागपूर ते ठाणे (मुंबई)-७०१ किमी-डिसेंबर २०२३

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inauguration of samriddhi highway in four phases from december 2023 mumbai print news amy
First published on: 08-12-2022 at 17:19 IST