मुंबई : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे उद्घाटन रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. पंतप्रधानांच्या नागपूर दौऱ्यात विविध कार्यक्रम होणार असून ते समृद्धी महामार्गावरून आणि नागपूर मेट्रो रेल्वेतून प्रवासही करणार आहेत. राज्य सरकारने उभारलेला देशातील सर्वाधिक लांबीचा आणि वेगवान असा ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग’ महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा ठरणार आहे. राज्याच्या सर्वागीण विकासात त्याचे मोठे योगदान राहील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी सांगितले. पहिल्या टप्प्यात नागपूर ते शिर्डी ७०१ कि.मी.पैकी ५२० कि.मी. मार्गाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यातील कार्यक्रमांच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठकीत घेतला. केंद्रीय मंत्रिमंडळाने नागपूर मेट्रो टप्पा दोन आणि नाग नदीप्रदुषण नियंत्रण प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. समृद्धी महामार्गामुळे विदर्भ, मराठवाडय़ासह राज्याच्या अन्य भागांतही औद्योगिक क्रांती होईल, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. या बैठकीत मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली. नागपूर विमानतळावर पंतप्रधानांचे आगमन झाल्यावर खापरी मेट्रो स्थानक येथे पहिल्या टप्प्याचे उद्घाटन, वंदे मातरम रेल्वेगाडीला हिरवा झेंडा, मिहान एम्सचे लोकार्पण हे कार्यक्रम होतील.

लोकार्पण कार्यक्रम वायफळ टोल नाक्यावर

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते वायफळ टोल नाका येथे समृद्धी महामार्गाचे उद्घाटन होईल. त्यानंतर मोदी झीरो माइल्स ते वायफळ टोलनाका असा प्रवास करतील. पंतप्रधानांची सभा टेम्पल मैदानावर होणार आहे. या वेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अश्विनी वैष्णव, हरदीप पुरी, केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, रावसाहेब दानवे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

आतापर्यंतची प्रगती

– महामार्गाचे २२ डिसेंबर २०१९ रोजी नामकरण.

– प्रकल्पासाठी ८८६१ हेक्टर जमिनीचे संपादन.

– प्रकल्पाचे १६ विभाग (पॅकेज), ११ विभागांचे काम पूर्ण.

– पहिल्या टप्प्यात नागपूर ते शिर्डी ७०१ किमीपैकी ५२० किमी रस्त्याचे लोकार्पण

– संपूर्ण प्रकल्प जुलै २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inauguration samriddhi by pm tomorrow mumbai nagpur highway will speed up the development chief minister eknath shinde ysh
First published on: 10-12-2022 at 00:02 IST