मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रभरातून हजारो आंदोलनकर्ते मुंबईत शुक्रवारी सकाळी दाखल झाले होते. त्यातच पावसाने हजेरी लावल्याने आंदोलकांचे प्रचंड हाल झाले. आंदोलनकर्त्यांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आणि विविध नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या. मोफत शौचालये, पिण्याचे पाणी, मोफत वैद्यकीय सहाय्य आदी सुविधांमुळे आंदोलनकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला.
मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदान येथे मराठा मोर्चाच्या निमित्ताने राज्यभरातून आलेल्या आंदोलकांची संख्या लक्षात घेता, महानगरपालिकेने आवश्यक त्या विविध नागरी सेवा-सुविधा पुरवल्या आहेत. आझाद मैदानात शुक्रवारी पावसामुळे चिखल झाला होता. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी प्रचंड गैरसोय झाली. महापालिकेने ही बाब लक्षात घेत आझाद मैदान व आसपासच्या परिसरात कीटकनाशक धूम्रफवारणी केली. तसेच, आंदोलनस्थळी प्रवेशमार्गाजवळ झालेला चिखल हटवून, त्या मार्गिकेवर २ ट्रक खडी टाकून रस्ता समतल करण्यात आला.
आझाद मैदान व आजूबाजूच्या परिसरातील ‘पैसे घ्या व वापरा’ तत्वावरील सर्व सार्वजनिक शौचालये आंदोलकांच्या वापरासाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहेत. आझाद मैदानाच्या आतल्या बाजूस एकूण २९ शौचकुपे असणारे शौचालयही आंदोलकांच्या वापरासाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच, लगतच्या महात्मा गांधी मार्गावर प्रत्येकी १० शौचकुपे असणारी एकूण तीन फिरती शौचालये उपलब्ध करण्यात आली आहेत. कार्यकारी अभियंता (परिवहन) (पश्चिम उपनगरे) यांच्या कार्यालयामार्फत आझाद मैदानातील मेट्रो परिसराजवळ एकूण १२ फिरती (पोर्टेबल) शौचालये उपलब्ध करण्यात आली असून आणखी शौचालयांची सोय करण्यात येणार आहे.
आंदोलनस्थळी पिण्याच्या पाण्यासाठी एकूण ६ टॅंकर्स पुरविण्यात आले होते. त्यांनतरही अतिरिक्त टॅंकर्स मागविण्यात आले. महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत आंदोलनकर्त्यांच्या उपचार व वैद्यकीय तपासणीसाठी वैद्यकीय मदत कक्ष उभारण्यात आला आहे. तसेच १०८ रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. शिवाय आंदोलनस्थळ व संपूर्ण आजूबाजूच्या परिसरात स्वच्छतेसाठी पुरेशा संख्येने कर्मचारी नेमण्यात आले आहेत.