मुंबई : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात आता सायबर हल्ल्यांचे प्रमाण वाढल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. २३ एप्रिलपासून देशभरात १० लाखांहून अधिक हल्ल्यांची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाकडून करण्यात आले आहे. याबाबत सायबर विभागाकडून सविस्तर अहवाल तयार करण्यात आला आहे.

सायबर हल्ले पाकिस्तान, मध्य पूर्वेतील देश, मोरोक्को आणि इंडोनेशिया या देशांतून होत आहेत. या हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्या अनेक हॅकर गटांनी स्वतःला विशेष नाव दिले आहे. त्यातील ‘टीम इन्सेन पीके’ हा पाकिस्तानस्थित गट सर्वाधिक सक्रिय आहे. त्याच्याकडून सर्वाधिक हल्ले होत असल्याचा संशय आहे. या गटाने भारतीय सैनिकी शिक्षण संस्थांवर, सैनिक कल्याण संकेतस्थळ आणि अनेक सैनिकी शाळांच्या संकेस्थळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.सायबर हल्ल्यांना २३ एप्रिलपासून सुरुवात झाली होती. त्यानंतर २६ एप्रिलपासून या हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणत वाढ झाली. काही हल्ले यशस्वीही झाले आहेत, असे ‘इकोज ऑफ पहलगाम’ या अहवालात नमूद आहे. महाराष्ट्र सायबर विभागाने अनेक हल्ले अडवले असले तरी भारतीय रेल्वे, बँकिंग नेटवर्क्स आणि सरकारी संकेतस्थळ यांसारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना आता अधिक धोका असल्याचा इशार देण्यात आला आहे.

संघटित सायबर युद्धासारखी स्थिती

‘इकोज ऑफ पहलगाम’ या सविस्तर अहवालानुसार, २३ एप्रिलपासून जवळपास १० लाख सायबर हल्ले नोंदवले गेले आहेत. एखाद्या हॅकरकडून हे हल्ले झालेले नसून, या मागे एक गट असल्याचा संशय आहे. दहशतवाद्यांनी राबवलेल्या मोहिमेचा हा भाग असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. हे फक्त हल्ले नसून संघटित सायबर युद्धासारखी स्थिती असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

‘वेब डिफेसमेंट’चे प्रकार अधिक

सायबर हल्ल्यांमध्ये ‘वेबसाइट डिफेसमेंट’, ‘कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम एक्सप्लॉयटेशन’ आणि ‘कमांड अँड कंट्रोल (सी-२)’ हल्ले यांचा समावेश होतो. त्यात सर्वाधिक हल्ले वेबसाइट डिफेसमेंटचे होते. ‘मिस्टेरियस टीम बांग्लादेश’ आणि इंडोनेशियातील ‘इंडो हॅक्स सेक्शन’ हे गटही सक्रिय असून, त्यांनी भारतीय दूरसंचार डेटा प्रणाली आणि प्रशासकीय संकेतस्थळांवर हल्ला केल्याचे प्राथमिक तपासणीत निष्पन्न झाले आहे.

२६ एप्रिलनंतर प्रचंड वाढ

सायबर हल्ल्यांना २३ एप्रिलपासून सुरुवात झाली होती. त्यानंतर २६ एप्रिलपासून या हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणत वाढ झाली. काही हल्ले यशस्वीही झाले आहेत, असे अहवालात नमूद आहे. महाराष्ट्र सायबर विभागाने अनेक हल्ले अडवले असले तरी भारतीय रेल्वे, बँकिंग नेटवर्क्स आणि सरकारी संकेतस्थळ यांसारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना आता अधिक धोका असल्याचा इशार देण्यात आला आहे.

सायबरसुरक्षेतील त्रुटींमुळे काही हल्ले यशस्वी झाले. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे, भारतीय दूरसंचार क्षेत्रातील चोरी झालेला डेटाा ‘डार्क वेब’वर अपलोड करण्यात आला आहे. ही देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब असू शकते.- यशस्वी यादव, महाराष्ट्र सायबर विभाग प्रमुख