मुंबई : नुकत्याच संपलेल्या सप्टेंबर महिन्यात मुंबईमधील घरांच्या विक्रीत काहीशी वाढ झाली असून या महिन्यात तब्बल १२ हजार ०७० घरांची विक्री झाली आहे. या घर विक्रीतून सरकारला १,२९२ कोटी रुपये महसूल मिळाला आहे. दरम्यान, मुंबईमधील ११ हजार २३० घरांची ऑगस्टमध्ये विक्री झाली होती आणि यातून मुद्रांक शुल्काच्या रुपाने राज्य सरकारला १ हजार कोटी रुपये महसूल मिळाला होता.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला, जानेवारीत मुंबईतील १२ हजार २४९ घरांची विक्री झाली आणि यातून सरकारला ८७७ कोटी रुपये महसूल मिळाला. त्यानंतर एप्रिलपर्यंत घरांची विक्री तेजीत होती. मार्चमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक घर विक्री झाली आहे. मार्चमध्ये १५ हजार ५०१ घरे विकली गेली असून यातून सरकारला १५८९ कोटी रुपये महसूल मिळाला. एप्रिलमध्येही १३ हजारांहून अधिक घरे विकली गेली होती. पण मेमध्ये मात्र घर विक्री १२ हजाराचा टप्पा पार करू शकली नाही. मे आणि जूनमध्ये विक्री झालेल्या घरांची संख्या १२ हजारांच्या आतच होती. जुलैमध्ये घर विक्रीने १२ हजाराचा टप्पा पार केला.

पण ऑगस्टमध्ये पुन्हा घर विक्री साडेअकरा हजाराच्या आतच राहिली. तेव्हा सप्टेंबरमध्ये किती घरांची विक्री होते याकडे बांधकाम क्षेत्राचे लक्ष लागले होते. सप्टेंबरमध्ये घरांच्या विक्रीत काहीशी वाढ झाली आहे. सप्टेंबरमध्ये १२ हजार ०७० घरांची विक्री झाली असून राज्य सरकारला यातून १,२९२ कोटी रुपये महसूल मिळाला आहे. ही घर विक्री समाधानकारक मानली जात असून आता ऑक्टोबरमध्ये यात आणखी वाढ होण्याची शक्यता बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दसरा-दिवाळीचा काळ असून या काळात घर खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विकासकांकडूनही अनेक सवलती दिल्या जातात.

सप्टेंबरमधील घरविक्रीनुसार या महिन्यात १ ते २ कोटीदरम्यानच्या आणि ५ कोटी तसेच त्याहून अधिक किमतीच्या घरांच्या विक्रीत वाढ झाली आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये एकूण घर विक्रीच्या ३२ टक्के घरांची किंमत १ ते २ कोटी रुपयांदरम्यान होती. तर आता सप्टेंबर २०२५ मध्ये १ ते २ कोटी रुपये किंमतीच्या घरांच्या विक्रीचा टक्का वाढून ३३ टक्क्यांवर गेला. त्याचवेळी सप्टेंबर २०२४ मध्ये ५ कोटी आणि त्याहून अधिक किंमतीची ५ टक्के घरे विकली गेली होती. सप्टेंबर २०२५ मध्ये हे प्रमाण ७ टक्के आहे. मात्र त्याचवेळी परवडणाऱ्या घरांची विक्री काहीशी कमी झाल्याचे चित्र आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये १ कोटीपेक्षा कमी किंमतीच्या ४५ टक्के घरांची विक्री झाली होती.

सप्टेंबर २०२५ मध्ये हे प्रमाण ४२ टक्के आहे. २ ते ५ कोटी रुपये किंमतीची १८ टक्के घरे सप्टेंबर २०२४ मध्ये विकली गेली होती, तर सप्टेंबर २०२५ मध्येही हे प्रमाण १८ टक्के आहे. त्याच वेळी विक्री झालेल्या घरांपैकी ५९ टक्के घरे ही पश्चिम उपनगरातील आहेत. त्यामुळे पश्चिम उपनगरातील घरांना सर्वाधिक मागणी असल्याचे समोर आले आहे. पूर्व उपनगरातील २९ टक्के घरे विकली गेली असून दक्षिण मुंबईतील ८ टक्के आणि मध्य मुंबईतील ६ टक्के घरांची विक्री झाली आहे.