scorecardresearch

चार पुलांच्या दुरुस्ती खर्चात वाढ ; २३ कोटींवरून २८ कोटींवर

नव्या पाहणीमुळे शहर भागातील पुलांच्या दुरुस्तीचा खर्च वाढला, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

मुंबई : शहर भागातील आणखी पाच पुलांच्या दुरुस्तीच्या खर्चात वाढ झाली आहे. हिमालय पुलाच्या दुर्घटनेनंतर सर्व पुलांच्या दुरुस्तीमध्ये नव्या सल्लागारांनी बदल सुचवल्यामुळे हा खर्च वाढल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. प्रिन्सेस स्ट्रीट रेल्वे उड्डाणपूल, हिंदूी विद्याभवन पादचारी पूल, केम्पस कॉर्नर उड्डाणपूल, केनेडी रेल्वे उड्डाणपूल बेलासिस उड्डाणपूल व रे रोड रेल्वे उड्डाणपूल या पुलांच्या दुरुस्ती खर्चात २४ टक्के वाढ झाली आहे. दुरुस्तीचा खर्च २३ कोटींवरून २८ कोटी रुपयांवर गेला आहे.

महाड येथील सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर पालिकेने मुंबईतील सर्व पुलांचे, तसेच रेल्वे स्थानकांवरील पुलांचे सर्वेक्षण हाती घेतले होते. या सर्वेक्षणाच्या अहवालात मुंबईतील महालक्ष्मी, करीरोड, शीव, रे रोड, मुंबई सेंट्रल, ग्रॅन्टरोड या रेल्वेस्थानकांवरील पूल तसेच शीव रुग्णालयाजवळील पूल, माहीम फाटक येथील आणि दादर धारावी नाल्यावरील पादचारी पुलाची दुरुस्ती करण्याचे सुचवण्यात आले होते. त्यानुसार पुलांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली होती. या पुलांच्या दुरुस्तीसाठी २०१९ मध्ये कंत्राट देण्यात आले होते. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालय पूल पडल्यानंतर शहर भागातील सर्व पुलांची व पादचारी पुलांची पुन्हा एकदा संरचनात्मक तपासणी करण्यात आली.

नव्या पाहणीमुळे शहर भागातील पुलांच्या दुरुस्तीचा खर्च वाढला, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. चार, पाच पुलांच्या वाढीव कामाचा खर्च टप्प्याटप्प्याने स्थायी समितीसमोर सादर करण्यात येत आहे. यापूर्वी महालक्ष्मी, करीरोड,  टिळक पूल, दादर फूल बाजाराजवळील पूल अशा चार रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या पुलांच्या दुरुस्तीचा खर्च २६ कोटी रुपयांवरून ३४ कोटी रुपयांवर गेल्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. आता आणखी काही पुलांच्या खर्चातही वाढ झाल्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यामुळे शहर भागातील एकूण पुलांच्या दुरुस्ती खर्चात एकूण १३ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.

रेल्वे उड्डाणपुलावरील दुरुस्तीच्या कामानंतर पादचारीपुलांच्या दुरुस्तीही सुचवण्यात आली. त्यामुळे हा खर्च वाढल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. या सहा पुलांच्या दुरुस्तीची मूळ कंत्राट रक्कम २३ कोटी १७ लाख रुपये होती. त्यात ५ कोटी ७२ लाख रुपयांनी वाढ होऊन रक्कम २८ कोटी रुपयांवर गेली आहे. तर सर्व कर ग्राह्य धरल्यास वाढ २८ कोटी रुपयांवरून ३४ कोटी रुपयांवर गेली आहे. यापूर्वीही चार पुलांच्या दुरुस्ती खर्चात आठ कोटी रुपयांनी वाढ झाली होती.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Increase in repair costs of four bridges from 23 crores to 28 crores zws

ताज्या बातम्या