मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्त्याचा वाकोला, पश्चिम द्रुतगती महामार्गापर्यंत विस्तार करण्यात आला आहे. या विस्ताराअंतर्गत बांधण्यात आलेल्या कपाडीया नगर ते वाकोला, पश्चिम द्रुतगती महामार्ग उन्नत रस्त्यातील वाकोला नाला ते पानबाई शाळा या शेवटच्या टप्प्यातील उन्नत रस्त्याचे १४ ऑगस्टला लोकार्पण झाले आहे. या उन्नत रस्त्यामुळे अमर महल जंक्शन ते वाकोला, पश्चिम द्रुतगती महामार्ग असा प्रवास केवळ ३५ मिनिटात करता येत आहे. मात्र वाकोला, पानबाई शाळेजवळ उन्नत रस्ता संपल्यानंतर मात्र अतिवेगाने येणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीत अडकावे लागत आहे. तर या वाहनांमुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीतही वाढ होत आहे.

रस्ते प्रकल्प वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी असताना या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडीत वाढ होत असल्याने वाहतूक तज्ज्ञांकडून नाराजी व्यक्त होत असून एमएमआरडीएच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडून या दोन्ही उपनगरातील प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी एमएमआरडीएने सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता प्रकल्प बांधला. पुढे बीकेसी आणि वाकोला येथे जाणे सोपे व्हावे यासाठी जोडरस्ता प्रकल्पाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कोट्यवधी रुपये खर्च करून या विस्तारीकरणाअंतर्गत कपाडीया नगर ते वाकोला, पश्चिम द्रुतगती महामार्ग असा ३.०३ किमीचा उन्नत रस्ता बांधला. या उन्नत रस्त्यातील काही टप्पा याआधीच वाहतूक सेवेत दाखल झाला होता. केबल स्टेड पूलाचा समावेश असलेल्या वाकोला नाला ते पानबाई शाळा अशा १.०२ किमीच्या टप्प्याचे काम शिल्लक होते. हे काम पूर्ण करून १४ ऑगस्टला हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यात आला आहे.

उन्नत रस्ता वाहतूक सेवेत दाखल होऊन आठ दिवस होत नाही तोच या रस्त्यावरील गतिरोधक उखडले आणि त्यांच्या दुरुस्तीसाठी हा रस्ता दोन तास बंद ठेवावा लागला. दुसरीकडे या हलगर्जीपणाबद्दल कंत्राटदारास १० लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. त्यात आता या उन्नत रस्त्यामुळे पूर्व ते पश्चिम द्रुतगती महामार्ग अंतर कमी झाले आहे, मात्र पानबाई शाळा येथील वाहतूक कोंडीत वाढ झाली आहे.

सांताक्रुझ, वाकोला येथे नेहमी वाहतूक कोंडी असते. त्यात रात्रीच्या वेळेस उन्नत रस्त्यावरुन मोठ्या संख्येने वाहने येऊ लागल्याने येथील वाहतूक कोंडीत वाढ होत असल्याची माहिती वाहतूक तज्ज्ञ अशोक दातार यांनी दिली. तर या एमएमआरडीएच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित करत एमएमआरडीएकडे ईमेलद्वारे याबाबत तक्रारही केली आहे.

नवीन उन्नत रस्ता वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी बांधण्यात आला, मात्र त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या आणखी वाढल्याचे सामाजिक कार्यकर्ते झोरू बथेना यांनी सांगितले. पश्चिम द्रुतगती महामार्ग त्यावर उड्डाणपूल आणि त्यावर उन्नत रस्ता असून महामार्ग, उड्डाणपूल आणि उन्नत रस्ता अशा तिन्ही ठिकाणी सायंकाळी ते रात्रीच्या वेळेस वाहतूक कोंडी असल्याचेही त्यांनी सांगितले. तिन्ही स्तरावर वाहतूक कोंडी असताना दुसरीकडे मात्र महामार्गाखालून जाणाऱ्या मेट्रो ३ (घाटकोपर-वर्सोवा) मार्गिकेवरील प्रवाशी संख्या अत्यल्प असल्याचा विरोधाभासही बथेना यांनी अधोरेखित केला. पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तातडीने एमएमआरडीएने उपाययोजना करावी अशी मागणीही केली. याविषयी एमएमआरडीएकडे विचारणा केली मात्र त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.