मुंबई : आरे वनक्षेत्रातील वाढता कचरा, अतिक्रमणाचा वेढा आणि नैसर्गिक जैवविविधतेचा होत असलेला ऱ्हास याबाबत पर्यावरणप्रेमी चिंता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरणप्रेमींनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन गेल्या पाच वर्षांपासून आरे परिसराला भेडसावणाऱ्या समस्यांवर कारवाई करण्याची विनंती केली.

‘निसर्ग माझा’चे संस्थापक शंकर सुतार आणि प्राणी हक्क कार्यकर्त्या, तसेच पर्यावरणवादी रेश्मा शेलटकर, शिवानी भट्ट आदींनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे सहाय्यक वनसंरक्षक विश्वजीत जाधव, सुधीर सोनवले आणि परिक्षेत्र वन अधिकारी नरेंद्र मुठे यांची भेट घेऊन गेल्या पाच वर्षांपासून आरे परिसराला भेडसावणाऱ्या समस्यांवर कारवाई करण्याची विनंती केली. या बैठकीत पर्यावरण कार्यकर्त्यांनी आरे परिसरात वाढणाऱ्या कचऱ्याचे ढिग, अतिक्रमण, अवैध वाहतूक यावर चर्चा केली. तसेच आरेतील जंगलात सर्रासपणे फेकला जाणारा प्लास्टिकचा कचरा, राडारोडा आणि त्यामुळे जैवविविधतेवर होणारा परिणाम याकडे लक्ष वेधले. दरम्यान, पर्यावरणप्रेमींनी प्रशासनाकडे या प्रश्नांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

आरे हा संवेदनशील परिसर जपण्यासाठी स्थानिक नागरिकांच्या सहभागातून एक पथक तयार करण्याची सूचना करण्यात आली. याशिवाय, पर्यटकांना मार्गदर्शन करण्यासाठी माहिती फलक, जागरुकता मोहीम आणि कचरा व्यवस्थापनासाठी ठोस उपाययोजना करण्याचा आग्रह यावेळी पर्यावरणप्रेमींनी धरला. दरम्यान, या समस्यांची गांभीर्याने नोंद घेतली असून लवकरच संयुक्त पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्यात येईल, असे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले.

याआधी वनक्षेत्रात टाकाऊ वस्तू, जुन्या फर्निचरचा ढीग

गेल्या महिन्यात आरे वसाहतीतील वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर टाकाऊ वस्तू आणि जुने फर्निचर आदी कचऱ्याचा ढीग साचल्याचे निदर्शनास आले होते. विशेष म्हणजे वन विभागाच्या कार्यालयाजवळील परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते. त्यात जुने पलंग, टेबल्स आणि इतर कचऱ्याचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. पर्यावरणप्रेमी दर आठवड्याला नित्यनेमाने आरे परिसरात स्वच्छता मोहीम राबवतात. दरम्यान, गेल्या महिन्यात परिसराची स्वच्छता करताना काही ठिकाणी त्यांना जुले पलंग, सोफा, गृहोपयोगी वस्तू आणि इतर कचरा फेकण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे वनक्षेत्रातील स्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हा परिसर जैवविविधतेने नटलेला आहे. पण नागरिक येथे घरातील टाकाऊ वस्तू फेकतात. हा परिसर कचराकुंडी नाही, अशी खंत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.

वैद्यकीय कचराही…

काही दिवसांपूर्वी आरेमधील न्यूझीलंड हॉटेलजवळ सीरिंज आणि रक्त्याच्या नमुन्यांचा कचरा पडला होता. मागील तीन – चार महिन्यांपूर्वीही सीरिंज टाकल्याचे निदर्शनास आले होते. या परिसरात प्रामुख्याने बिबटे, तसेच इतर प्राण्यांचा वावर असतो. त्यांना या कचऱ्यामुळे त्रास होण्याची दाट शक्यता आहे, असे पर्यावरणप्रेमीनी सांगितले.