मुंबई : स्वातंत्र्यदिनानिमित्त शुक्रवारी आलेली सार्वजनिक सुट्टी आणि त्याला लागून आठवडाअखेरच्या सलग सुट्टयांमुळे मुंबईमधील विविध पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी झाली होती. त्यातच ठिकठिकाणच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सुट्टीचे औचित्य साधून वाजतगाजत गणेशमूर्ती मंडपात स्थानापन्न केली. तसेच गणेशोत्सवानिमित्तच्या खरेदीसाठी मुंबईतील विविध ठिकाणच्या बाजारपेठा गर्दीने फुलून गेली होती.

मुंबईतील वांद्रे बँडस्टँड, दादर, जुहू व गिरगाव चौपाटी, मरिन लाईन्स, गेट वे ऑफ इंडिया भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय (राणीची बाग) आदी विविध पर्यटनस्थळांवर नागरिकांनी गर्दी केली होती. तसेच अनेकांनी विविध मंदिरांमध्ये जाऊन देव – देवतांचे दर्शन घेतले. अनेकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून प्रवास करण्यास पसंती दिल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, वांद्रे, अंधेरी आदी महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी झाली होती. परिणामी तिकीट खिडकींवर प्रवाशांच्या मोठ्या रांगा लागल्या होता.

स्वातंत्र्यदिनी सकाळी ध्वजारोहण करून कार्यकर्त्यांची पावले लालबाग – परळमधील गणेश कार्यशाळांकडे वळली. गणपतीच्या आगमनासाठी बहुसंख्येने युवा पिढीची गर्दी उसळली होती. या ठिकाणी ढोल – ताशांच्या गजरात युवा पिढी थिरकत होती. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया अशा जयघोषाने परिसर दणाणून गेला होता. तर काहीजण आगमनाचा क्षण आणि गणेशमूर्तीची चायाचित्रे मोबाइलच्या कॅमेऱ्यात टिपण्यात दंग होते. ही गर्दी व्यवस्थितरित्या हाताळण्यासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच लालबाग – परळच्या दिशेने जाणारी वाहतूक दुसऱ्या मार्गानेही वळविण्यात आली होती. गणेशमूर्ती आगमनाच्या रस्त्यांवर विशेषतः चारचाकी वाहने नेण्यास मज्जाव करण्यात आला होता. गर्दीमुळे काही प्रमाणात या परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती, मात्र वाहतूक पोलिसांनी योग्य नियोजन करीत नियंत्रण मिळवले.