मुंबई : भारत हा केवळ अब्जाहून अधिक लोकसंख्येचा देश नव्हे तर तो अब्जाहून अधिक कहाण्यांचाही देश आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ‘जागतिक दृक्-श्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचे ( वेव्ह्ज) उद्घाटन मोदी यांच्या हस्ते वांद्रे-कुर्ला संकुलात जिओ वर्ल्ड येथे करण्यात आले. दोन हजार वर्षांपूर्वी भरत मुनींच्या नाट्यशास्त्रात भावना आणि कलेच्या सामर्थ्यावर अधिक भर देण्यात आला आहे. कित्येक शतकांपूर्वी कालिदासाच्या अभिज्ञान शाकुंतलम् या कलाकृतीने अभिजात नाट्यप्रकाराला नवी दिशा दिली होती.

भारताच्या प्रत्येक मार्गाशी संबंधित कहाणी आहे, प्रत्येक पर्वताचे एक गीत आहे आणि प्रत्येक नदी एक धून गुणगुणते आहे, असे सांगून मोदी यांनी भारताच्या खोलवर रुजलेल्या सांस्कृतिक मुळांना अधोरेखित केले. भारतातील सहा लाख गावांपैकी प्रत्येकाची स्वत:ची अशी लोकपरंपरा आणि अनोखी कथाकथन शैली आहे आणि येथील समुदाय लोककथांच्या माध्यमातून त्यांच्या इतिहासाची जपणूक करीत आहेत, असे मोदी यांनी सांगितले. भारतीय संगीताचे आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित करून मोदी म्हणाले, भजन, गझल, शास्त्रीय रचना किंवा समकालीन सूर असो, प्रत्येक गीतामध्ये एक कथा असते आणि प्रत्येक लयीत एक आत्मा असतो.

नादब्रह्म या दैवी ध्वनीची संकल्पना अधोरेखित करीत मोदी यांनी भारताच्या खोलवर रुजलेल्या कलात्मक आणि आध्यात्मिक वारशावर भर दिला. भगवान शिवाचे डमरू हा पहिला वैश्विक ध्वनी, देवी सरस्वतीची वीणा ही ज्ञानाची लय, भगवान कृष्णाची बासरी ही प्रेमाचा शाश्वत संदेश तर भगवान विष्णूचा शंख हे सकारात्मक ऊर्जेचे आवाहन आहे. भारताच्या कथा कालातीत, विचारप्रवर्तक आणि खऱ्या अर्थाने जागतिक आहेत. त्यामध्ये केवळ सांस्कृतिक विषयच नाहीत तर विज्ञान, क्रीडा, धैर्य आणि शौर्य यांचाही समावेश आहे.

देशाची आर्थिक प्रगती वेगाने होत असून देशाची अर्थव्यवस्था जगातील तिसऱ्या क्रमांकाची होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. भारत सध्या जागतिक अर्थविषयक तंत्रज्ञान स्वीकारण्याबाबत जगात पहिल्या क्रमांकावर आहे, जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल फोन उत्पादक देश आहे आणि जगभरातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्टार्ट अप परिसंस्था असणारा देश आहे.

नरेंद्र मोदीपंतप्रधान

ओटीटी उद्योगात १० पट वाढ

जागतिक अॅनिमेशन बाजारपेठेतील उलाढाल ४३० अब्ज डॉलरपेक्षा जास्त असून पुढील दशकात ती दुप्पट होण्याची शक्यता आहे. भारतीय चित्रपट आता १०० हून अधिक देशांतील प्रेक्षकांपर्यंत पोहोचले आहेत, जागतिक प्रेक्षक केवळ वरवरचे कौतुक करण्यापेक्षा भारतीय सिनेमा समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. भारतातील ओटीटी उद्याोगात अलीकडच्या वर्षांत दहापट वाढ झाली आहे, भारतीय खाद्यापदार्थ जागतिक पसंतीचे होत आहेत आणि भारतीय संगीत ही लवकरच जगभरात अशीच ओळख मिळवेल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.