मुंबई : भारतीय लष्करासाठी ४६.८ कोटी डॉलर किमतीची क्षेपणास्त्रे खरेदीसाठी भारताने ब्रिटनशी करार केला. ब्रिटिश विद्यापीठांना भारतात विद्यासंकुले उभारण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. याबरोबरच उद्योग, तंत्रज्ञान, व्यापार या क्षेत्रातही ब्रिटिश कंपन्या भारतात गुंतवणूक करणार आहेत. ‘सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या कालखंडात भारत आणि ब्रिटन या दोन देशांमधील भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा आधार ठरेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.

भारत भेटीवर आलेले ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी राजभवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर उभयतांनी संयुक्त निवेदन सादर केले. याबरोबरच ‘भारत – ब्रिटन सीईओ फोरम’ तसेच ‘ग्लोबल फिनटेक’ परिषदेत दोन्ही पंतप्रधानांची भाषणे झाली. शिक्षण, संरक्षण, तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांमध्ये करारही करण्यात आले. ब्रिटन भारताला हलकी बहुउद्देशीय क्षेपणास्त्रे पुरविणार आहे. भारतासाठी ४६.८ कोटी डॉलर किमतीची क्षेपणास्त्रे पुरविण्याच्या करारावर या वेळी स्वाक्षऱ्या करण्यात आल्याची माहिती ‘राॅयटर्स’ वृत्तसंस्थेने दिली आहे.

ब्रिटिश विद्यापीठे भारतात

ब्रिटिश विद्यापीठांना भारतात विद्यासंकुले उभारण्यासही संधी देण्यात आली आहे. आतापर्यंत नऊ विद्यापीठांशी करार झाले आहेत. आज बंगळूरुमध्ये लँकेस्टर विद्यापीठाचे केंद्र तसेच गुजरातमधील गिफ्ट सिटीत सरे विद्यापीठाचे केंद्र उभारण्यास मान्यता देण्यात आली. गेल्या जुलै महिन्यात भारत आणि ब्रिटनमध्ये आर्थिक व्यापार करार करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर उभय राष्ट्रांमधील व्यापारी संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान स्टार्मर यांनी व्यक्त केला.

आजच्या बैठकीत ‘भारत – ब्रिटन व्हिजन २०३५’, संरक्षण आराखडा निश्चित करण्यात आला. भारत – ब्रिटनमधील आर्थिक व्यापारी कराराचे लाभ मिळावेत यादृष्टीने विचारविनिमय करण्यात आला. उभय राष्ट्रांमधील उद्योगांचा फायदा कसा होईल यादृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. संरक्षण, शिक्षण, तंत्रज्ञान, व्यापार या क्षेत्रांत महत्त्वाचे करार करण्यात आले असून, भारत भेट यशस्वी झाल्याचा दावा स्टार्मर यांनी केला. ब्रिटिश उद्योगपतींसाठी भारतात नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. अशा संधी अन्य राष्ट्रांमधील उद्योजकांना मिळालेल्या नाहीत. आमच्यासाठी ही मोठी संधी आहे, असे स्टार्मर यांनी म्हटल्याचे वृत्त ‘राॅयटर्स’ने दिले आहे.

नैसर्गिक भागीदार

भारत आणि ब्रिटन हे नैसर्गिक भागीदार आहेत. लोकशाही, स्वातंत्र्य आणि कायद्याचे राज्य हा उभय राष्ट्रांमधील समान धागा असल्याचे उद्गार मोदी यांनी काढले. मुक्त व्यापार करारामुळे दोन्ही राष्ट्रांचा फायदा होणार आहे. व्यापाराला अधिक चालना मिळेल, असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला.

गाझा शांतता प्रस्तावाचे स्वागत

गाझामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधान मोदी तसेच ब्रिटनचे पंतप्रधान स्टार्मर यांनी स्वागत केले.