देशात सध्या सुरू असलेली क्रिकेट विश्वचषक २०२३ स्पर्धा ही अंतिम टप्प्यात आली आहे. आज (१५ नोव्हेंबरला) भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन संघात मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये सेमी फायनल सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी मुंबई पोलिसांच्या ट्वीटर हँडलवर ट्वीट करून धमकी देण्यात आली आहे. संबंधित ट्वीट मंगळवारी रात्री प्राप्त झाले आहे. या ट्वीटमध्ये एक फोटो असून त्यामध्ये बंदूक, हँडग्रेनेड व काडतूस आहे.

या छायाचित्राखाली भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये आग लावण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर मुंबई पोलिसांच्या ट्विटर सेलने याबाबतची माहिती मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर गुन्हे शाखा व इतर विभागांना याबाबत कळवण्यात आलं आहे. या धमकीनंतर काही तासांत मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं लातूर जिल्ह्यातून एका १७ वर्षीय संशयित तरुणाला ताब्यात घेतलं आहे. त्यानेच ट्विटरवरून ही धमकी दिल्याचं समजत आहे. पण तरुणाने अशी पोस्ट करून धमकी का दिली? याबाबत अद्याप कसलीही माहिती समोर आली नाही. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात मुंबई पोलिसांना अशी धमकी व खोटी माहिती देणारे किमान शंभरहून अधिक संदेश अथवा दूरध्वनी प्राप्त झाले आहेत. याबाबत अधिकाऱ्याने सांगितले की, अशा प्रकरणांकडे कानाडोळाही करता येत नाही. त्यामुळे सर्व प्रकरणांची तपासणी करण्यात येते. त्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागते. खूप प्रयत्न करूनही धमकी अथवा संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीला अटकही होते. अशा प्रकरणांसाठी विशेष कायदा नाही. परिणामी, अशा प्रकरणांमध्ये आरोपीला लवकर जामीन मिळतो. त्यामुळे याप्रकरणासाठी कठोर कायदा करण्याची आवश्यकता असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.