India vs South Africa Women’s World Cup 2025: मुंबई : दक्षिण आफ्रिकेची लढत मोडून काढत हरमनप्रीत कौरच्या जिगरबाज मुलींनी २ नोव्हेंबर रोजी नवी मुंबईत पहिल्यावहिल्या विश्वचषकावर नाव कोरले. कपिलदेव यांच्या संघाने १९८३मध्ये भारताला पहिलावहिला विश्वचषक जिंकून दिला होता. त्या विजयात आणि महिला संघाच्या विजयात अनेक साम्यस्थळे आढळतात.
डेअरडेव्हिल्स आणि हरिकेन्स…
कपिलदेवच्या संघाला त्या वेळी ‘कपिल्स डेव्हिल्स’ असे कौतुकमिश्रित थट्टेने संबोधले जायचे. त्या संघात अनेक अष्टपैलू क्रिकेटपटू होते. पण बहुतेक सगळेच डेअरडेव्हिल स्वभावाचे, म्हणजे कोणत्याही संकटाला न डगमगता सामोरे जाणारे होते. कपिलदेव, मोहिंदर अमरनाथ, संदीप पाटील, के. श्रीकांत, यशपाल शर्मा, बलविंदर संधू असे बेधडक भिडू होते. त्यांच्या बरोबरीने सुनील गावस्कर,दिलीप वेंगसरकर, रॉजर बिन्नी, मदनलाल, रवी शास्त्री असे स्थिरचित्त खेळाडूही होते. या संघाकडून त्यावेळी फार कुणाला अपेक्षा नव्हत्या, तरी एक धोकादायक संघ म्हणून त्याची दखल घेतली जाई.
हरमनप्रीत किंवा तिच्या बहुतेक सहकाऱ्यांचा भाषेत हॅरी दी (हॅरी ताई) हिच्या संघातही अशा बेधडक आणि स्थिरचित्त खेळाडूंचा संमिश्र भरणा आढळतो. पंजाबी हरमनप्रीतमध्ये हरयाणवी कपिलदेवची अनेक लक्षणे आढळून येतात. सर्वांत महत्त्वाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घ्यायची, हे एक ठळक साम्यस्थळ. हरमनप्रीत, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, रिचा घोष अशा बेधडक खेळाडूंची एक फळी. तिला स्मृती मनधाना, रेणुका सिंग, अमनज्योत कौर, राधा यादव, क्रांती गौड अशा स्थिरचित्त पण गुणवान खेळाडूंची साथ.
निराशाजनक पराभवांची मालिका
१९८३ विश्वचषक स्पर्धेत भारताने सुरुवात धडाक्यात केली. पण साखळी टप्प्यात वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव झाल्यामुळे भारताची स्थिती नाजूक बनली होती. झिम्बाब्वेविरुद्ध पराभव भारतासाठी परतीचे तिकिट निश्चित करण्यासाठी पुरेसा ठरला असता. पण त्या सामन्यात ५ बाद १८ अशा अवस्थेतून कपिलदेव यांच्या थरारक १७५ धावांच्या नाबाद खेळीने भारताला सावरले आणि एक अविस्मरणीय विजय भारताला मिळवता आला.
यंदाच्या महिला विश्वचषक स्पर्धेतील भारताची स्थितीही काहीशी अशीच होती. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध सलग तीन सामन्यांत पराभूत झाल्यामुळे भारताच्या उपान्त्य फेरीच्या आशा दोलायमान बनल्या होत्या. अशा परिस्थितीत न्यूझीलंडविरुद्ध जिंकणे अत्यावश्यक बनले. त्या सामन्यात सामनावीर स्मृती मनधाना आणि प्रतिका रावलने झंझावाती शतके झळकावली. भारताने विजय साकारला आणि उपान्त्य फेरीतील स्थान सुनिश्चित केले. हरमनप्रीत त्या सामन्यात चमकली नाही. तरी तिची उपान्त्य सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धची ८९ धावांची खेळी भारतीय डावाला आकार देणारी ठरली. त्या सामन्यातील जेमिमा रॉड्रिग्जच्या खेळीचे कौतुक अधिक होते. पण सखोल विश्लेषण केल्यास धावगती केव्हा वाढवायची, विकेट्स कशा शाबूत राखायच्या याचे संपूर्ण नियंत्रण आणि नियमन हरमनप्रीतनेच केले.
तेव्हा वेस्ट इंडिज, आता ऑस्ट्रेलिया
वेस्ट इंडिजचा संघ १९८३मधील विश्वचषक जिंकेल, असा अंदाज त्यावेळी सर्वांनीच बांधला होता. त्यांनी आधीचे दोन विश्वचषक जिंकले होतेच. त्या दोन्ही स्पर्धांतील बहुतेक खेळाडू १९८३मध्येही खेळत होते. अफाट गुणवत्ता, असीम धैर्य असलेल्या त्या संघात कोणतेही कच्चे दुवे नव्हते. अशा या संघाला जेव्हा भारताने पहिल्या साखळी सामन्यात पराभूत केले, त्यावेळी विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील वेस्ट इंडिजचा तो पहिलाच पराभव ठरला! अंतिम सामन्यात आणखी एक संस्मरणीय विजय मिळवून भारताने वेस्ट इंडिजची क्रिकेटमधील सद्दी संपवली नि स्वतःची एक प्रकारे प्रस्थापित केली. त्या स्पर्धेने क्रिकेटविषयी ज्या प्रकारची आवड आणि प्रेम भारतीय जनमानसात निर्माण केले, ते सातत्याने वाढतच गेले.
भारतीय महिलांचा उपान्त्य सामनातील ऑस्ट्रेलियाविरुद्धचा विजय तितकाच तोलामोलाच ठरतो. २०१७मधील स्पर्धेत भारताने ऑस्ट्रेलियाला उपान्त्य फेरीतच हरवले होते. त्यानंतरचा पराभव ऑस्ट्रेलियाने नवी मुंबईत भारताविरुद्ध पाहिला. जवळपास १५ विजयी सामन्यांची कांगारूंची मालिका भारताने खंडित केली. या संघाने जितक्यांदा विश्वचषक जिंकला (७ वेळा), तितका इतर तीन संघांनी (इंग्लंड, न्यूझीलंड, भारत मिळून ६) मिळूनही जिंकलेला नाही, अशी त्यांची वर्चस्वदर्शक कामगिरी आहे. अशा संघाला हरवणे ही अविस्मरणीय अशीच कामगिरी. त्या अर्थाने ही कामगिरी पुरुष संघाच्या १९८३मधील वेस्ट इंडिजविरुद्ध विजयाच्या तोडीची ठरते.
१९८३ नंतर २०२५ची क्रांती?
कोणत्याही खेळात हार-जीत असतेच. सातत्यपूर्ण खेळही दिसतो. पण एखादा खेळ लोकप्रिय होण्यासाठी त्या दर्जाचे अजिंक्यपद आवश्यक ठरते. भारतामध्ये क्रिकेटचा खेळ दशकानुदशके लोकप्रिय होता. या लोकप्रियतेला १९८३मधील ‘कपिल्स डेव्हिल्स’च्या विजयामुळे बूस्टर मिळाला. या खेळात पैसा आला, आत्मविश्वास आला नि खेळाची आवड अधिक व्यापक बनली. ती काही मोठ्या शहरांपुरती सीमित राहिली नाही. १९८३मधील संघात उत्तर भारतीय, पश्चिम भारतीय आणि दक्षिण भारतीय खेळाडूंचा भरणा होता. त्याचाही फायदा झाला. आपण कुठेही, कोणत्याही संघासमोर कमी ठरणार नाही ही वृत्ती त्या विजयानंतर भिनली. यातूनच पुढे भारतीय पुरुष क्रिकेट क्षेत्राचा विकास झाला.
त्याच प्रकारच्या क्रांतीची ताकद विद्यमान महिला संघात आहे. किंबहुना, १९८३मधील संघापेक्षा आजच्या महिला क्रिकेटपटू अधिक व्यापक भारतातून आल्या आहेत. त्यांची आर्थिक, सामाजिक पार्श्वभूमीही अधिक व्यामिश्र आहे. या जोडीला सध्याच्या संघास त्यावेळच्या संघापेक्षा कितीतरी अधिक भक्कम आर्थिक, कॉर्पोरेट, तांत्रिक पाठबळ आहे. त्या संघाने वेस्ट इंडिजचा दबदबा संपवला, तशीच क्षमता आजच्या महिला संघात ऑस्ट्रेलियाचा दबदबा संपवण्याची आहे.
