मुंबई : कोकणातील खड्डेमय रस्त्यांमुळे वाहनांचे प्रचंड नुकसान होते. वाहनांचा वेग मंदावल्याने, प्रवासाचा कालावधी वाढतो. यावर उपाय म्हणून कोकण रेल्वे मार्गावर देशातील पहिली रोल-ऑन रोल-ऑफ (रो-रो) कार सेवा चालविण्याची घोषणा करण्यात आली. या सेवेचे आरक्षण सुरू झाले असून गेल्या १० दिवसात एकच रो-रो कार सेवेचे आरक्षण करण्यात आले आहे. यावरून प्रवाशांकडून अद्याप या सेवेला प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
सानपाड्यातील प्रवासी ठरला पहिला मानकरी कोकण रेल्वे प्रशासनाने २१ जुलै रोजीपासून रो-रो सेवेचे आरक्षण सुरू केले. त्यानंतर, या सेवेसाठी सानपाडा येथील प्रवासी रोहन यांनी रो-रो कार सेवेचे आरक्षण केले. देशातील पहिल्या रो-रो सेवेचे आरक्षण करणारे रोहन हे पहिले प्रवासी ठरले आहेत. गणेशोत्सवानिमित्त त्यांना कणकवली येथे जायचे आहे.
रो-रो कधी धावेल
रायगड जिल्ह्यातील कोलाड आणि गोव्यातील वेर्णादरम्यान रो-रो सेवा उपलब्ध आहे. ही सेवा कोलाड – वेर्णा दोन्ही बाजूने फक्त अंतिम स्थानकांसाठी सुरू करण्यात आली आहे. रो-रोची सेवा २३ ऑगस्टपासून सुरू होईल. सायंकाळी ५ वाजता ही गाडी गोव्याच्या दिशेने रवाना होईल आणि ती दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता वेर्णा येथे पोहचेल. तर, परतीच्या प्रवासातही रो-रो सेवा वेर्णा येथून सायंकाळी ५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता कोलाड येथे पोहोचेल. प्रवासाच्या आधी तीन तास स्थानकांवर पोहचणे गरजेचे आहे. म्हणजे प्रवाशांना दुपारी २ वाजता स्थानकात पोहचणे आवश्यक आहे.
रो-रो सेवेसाठी किती भाडे
रो-रो सेवेसाठी प्रत्येक वाहनासाठी ७ हजार ८७५ रुपये भाडे असणार असून आरक्षण करताना ४ हजार रुपये नोंदणी शुल्क घेण्यात येणार आहे. उर्वरित रक्कम प्रवाशांना प्रवासाच्या दिवशी जमा करावी लागेल. अपुरे आरक्षण म्हणजे १६ पेक्षा कमी वाहने असल्यास फेरी रद्द करण्यात येणार असून प्रवाशाला पूर्ण नोंदणी शुल्क परत करण्यात येणार आहे.
रो-रो सेवेला रेल्वे डबे जोडणार
रो-रो सेवेला तृतीय वातानुकूलित डबा आणि द्वितीय वातानुकूलित डबा जोडण्यात येणार आहे. त्यामुळे रो-रोमधून खासगी वाहन असलेल्या प्रवाशांना प्रवास करणे शक्य होईल. एका खासगी वाहनांसाठी फक्त तीन प्रवाशांना या डब्यातून प्रवास करण्याची मुभा असेल. यासाठी प्रवाशांना तृतीय वातानुकूलित डब्यासाठी प्रति प्रवासी ९३५ रुपये आणि द्वितीय वातानुकूलित डब्यासाठी १९० रुपये मोजावे लागतील.
कोकण रेल्वेचे म्हणणे काय ?
कोकण रेल्वेवरून सुरू करण्यात येणारी रो-रो कार सेवा ही देशातील पहिली सेवा आहे. या सेवेसाठी एका प्रवाशाने आरक्षण केले आहे. तर, ४० हून अधिक प्रवाशांनी रो-रो कार सेवेबाबत चौकशी केली आहे. पुढील दोन आठवड्यांत या सेवेला प्रवाशांचा प्रतिसाद वाढेल, असा विश्वास कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.