Indigo : दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या विमानाचं इंजिन बुधवारी रात्री बिघडलं. त्यामुळे हे विमान तातडीने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आलं. इंडिगो विमानाने दिल्लीहून उड्डाण केल्यानंतर रात्री ९ वाजून २५ मिनिटांनी या विमानात बिघाड झाल्याची माहिती ATC ला दिली होती. त्यानंतर रात्री ९ वाजून ४२ मिनिटांनी या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत त्यांना विमानातून बाहेर काढण्यात आलं आहे.

इंडिगोच्या विमानात प्रवास सुरु असतानाच तांत्रिक बिघाड

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीहून गोव्याला निघालेल्या इंडिगोच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला आणि त्याचं इंजिन बंद पडलं. इंडिगो फ्लाईट 6E 231 या विमानाचं आपात्कालीन लँडिंग करावं लागलं. विमानाचं इंजिन बिघडल्याने वैमानिकाने हा निर्णय घेतला. मिड एअर असतानाच या विमानाचं इंजिन बंद पडलं. ATC ला याबाबत सूचना देण्यात आली. त्यानंतर मुंबई विमानतळावर रात्री ९ वाजून २५ मिनिटांनी इमर्जन्सी अलार्म वाजवण्यात आला. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर या विमानाचं लँडिंग करण्यात आलं. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंडिगोने काय म्हटलं आहे?

इंडिगोच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे की १६ जुलै २०२५ ला दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. ज्यानंतर सगळ्या नियमांचं पालन करुन आम्ही हे विमान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवलं. विमानाचं इमर्जन्सी लँडिंग आम्हाला करावं लागलं.मुंबई विमानतळावर इंडिगोचं विमान लँड करण्यात आल्यानंतर सगळी खबरदारी घेण्यात आली. तसंच प्रवाशांना त्यांना इच्छित स्थळी पोहचवण्याची पर्यायी व्यवस्थाही आम्ही केली. प्रवाशांना या सगळ्यामुळे जो त्रास झाला त्याबाबत आम्ही खेद व्यक्त करतो.