मुंबई : स्पायना बिफिडामुळे न्यूरोजेनिक बाऊल डिसफंक्शनने त्रस्त असलेल्या २८ वर्षीय रुग्णावर अत्याधुनिक कोलोनोस्कोपिक सिकोस्टॉमी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आहे. या शस्त्रक्रियेद्वारे रुग्णाला पोटावर छेद न देता स्वत:हून आतड्यांची स्वच्छता (अँटिग्रेड कोलोनिक सिंचन) करण्यास सक्षम करण्यात आले असून, पारंपरिक शस्त्रक्रियेपेक्षा ही प्रक्रिया सुरक्षित आणि कमी जोखमीची ठरली आहे. गर्भावस्थेदरम्यान फॉलिक अॅसिडची कमतरता आणि न्यूरल ट्यूबच्या अपूर्ण विकासामुळे होणारा ‘स्पायना बिफिडा’ हा जन्मजात आजार देशात चिंतेचा विषय ठरत आहे.
स्पायना बिफिडा हा न्यूरल ट्यूबचा जन्मजात दोष असून गर्भाच्या पाठीच्या कण्याच्या विकासात झालेल्या अडथळ्यामुळे हा विकार उद्भवतो. काही सौम्य प्रकरणे लक्षात येत नाहीत; मात्र गंभीर अवस्थेत बाळाला चालण्यात, मूत्र विसर्जनात किंवा शरीरावर नियंत्रण ठेवण्यात अडचणी येतात. एका अभ्यासानुसार भारतात न्यूरल ट्यूब दोषांचे प्रमाण ४.१ प्रति १,००० जन्मांमध्ये असून, त्यातील जवळपास अर्धी प्रकरणे स्पायना बिफिडाची असतात. त्यामुळे देशात दरवर्षी ४,००० ते ५,००० नवजात बालक या जन्म दोषाने ग्रस्त होतात.
ग्रामीण भागात नोंदणी अभावी हे प्रमाण अधिक असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. पारंपरिक शस्त्रक्रियांचे यात मर्यादित परिणाम दिसतात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कोलोनोस्कोपिक सिकोस्टॉमी ही सुरक्षित, प्रभावी आणि पुनरुत्पादनीय पर्याय म्हणून समोर आली आहे. या प्रक्रियेत एंडोस्कोपच्या सहाय्याने आतड्याच्या सिकोम भागात एक सूक्ष्म मार्ग तयार केला जातो. त्यातून रूग्ण स्वत:हून नियमित आतड्यांची स्वच्छता करू शकतो. यामुळे संक्रमणाचा धोका कमी होतो आणि जीवनमानात लक्षणीय सुधारणा होते.
मुंबईतील लिलावती रुग्णालयात ही शस्त्रक्रिया डॉ. रवीकांत गुप्ता (एंडोस्कोपी इंटरव्हेंशन्स सल्लागार) आणि डॉ. संतोष करमरकर (सल्लागार बालशल्यचिकित्सक व स्पायना बिफिडा तज्ञ) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. संपूर्ण प्रक्रिया केवळ एका तासात पूर्ण झाली आणि रुग्णाला दुसर्याच दिवशी घरी सोडण्यात आले. याबाबत डॉ. रवीकांत गुप्ता यांनी सांगितले की, कोलोनोस्कोपिक सिकोस्टॉमी ही न्यूरोजेनिक बाऊल डिसफंक्शनच्या उपचारात एक मोठी झेप आहे.
ही पद्धत बिनचीर, सुरक्षित आणि प्रभावी असून जलद रिकव्हरी आणि दीर्घकालीन फायदे देते. या तंत्रामुळे स्पायना बिफिडा रुग्णांचा आत्मविश्वास आणि स्वावलंबन मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यांना दैनंदिन जीवन अधिक सन्मानाने आणि सोप्या रीतीने जगता येते असे डॉ. संतोष करमरकर यांनी सांगितले.
स्पायना बिफिडा म्हणजे बाळाच्या मेरूदंडाच्या (स्पायनल कॉर्ड) आणि त्याच्या हाडांच्या विकासात होणारी एक जन्मजात (जन्मावेळी असलेली) विकृती. यात गर्भावस्थेत (साधारणपणे पहिल्या महिन्यात) बाळाचा न्यूरल ट्यूब म्हणजेच मेंदू आणि पाठीचा कणा बनवणारी रचना नीट बंद होत नाही. यामुळे पाठीच्या कण्यामध्ये एक फट राहते व त्यातून मेरू दंडाचा काही भाग किंवा मज्जातंतु बाहेर येतात.
स्पायना बिफिडाचे काही प्रकार आहेत. यात स्पायना बिफिडा ऑक्कल्टा हा सर्वात सौम्य प्रकार आहे. बहुतांश वेळा बाहेरून काही लक्षणे दिसत नाहीत. काहीवेळा त्वचेवर केसांचा गुच्छ, खळी किंवा पिगमेंटेड डाग दिसतो.
मेनींजोसीलमध्ये पाठीवर पाण्याने भरलेली पिशवीसारखी गाठ दिसते. पण मेरूदंडाचे तंतू बाहेर आलेले नसतात.शस्त्रक्रियेद्वारे यात उपचार केले जातात. मायलोमेनींजोसील हा सर्वात गंभीर प्रकार आहे.यात मज्जातंतू आणि मेरूदंडाचा काही भाग पिशवीबाहेर आलेला असतो. यामुळे अंगविकलांगता, मूत्र-विसर्जन नियंत्रणात बिघाड, चालण्यात अडचण, इ. समस्या होतात. याला काही कारणे आहेत ज्यात गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळातच फॉलिक अॅसिडची कमतरता, अनुवांशिकता, काही औषधे किंवा मधुमेहासारख्या आजारांमुळे हा त्रास होऊ शकतो असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यासाठी गर्भधारणेपूर्वी तसेच गर्भधारणेनंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने फोलिक ॲसिडचे सेवेन तसेच नियमित तपसाणी केली पाहिजे.