लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वर्सोवा-विरार सागरी सेतू बांधण्याचा निर्णय घेतला आहे. पण, आता मात्र वर्सोवा-विरार असा थेट सागरी सेतूच्या संरेखनात बदल करण्यात आला आहे. वर्सोवा-विरार सागरी सेतूऐवजी आता उत्तन (भाईंदर)-विरार असा सागरी सेतू एमएमआरडीए बांधणार आहे. त्यानुसार उत्तन-विरार सागरी सेतू प्रकल्पास बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

मुंबई महापालिका वर्सोवा-दहिसर, भाईंदर सागरी किनारा मार्ग (कोस्टल रोड) बांधणार आहे. त्यामुळे वर्सोवा-विरार सागरी सेतूची आवश्यकता नसल्याचे म्हणत वर्सोवा-विरार असा थेट सागरी सेतू न बांधता आता उत्तन (भाईंदर)-विरार असा सागरी सेतू एमएमआरडीएकडून बांधला जाणार आहे. या सागरी सेतूचा पुढे पालघरपर्यंत विस्तार केला जाणार आहे.

आणखी वाचा-मुंबई : सायबर फसवणूक करणाऱ्यांना सुमारे ५०० सिम कार्डची विक्री, आरोपीला अटक

मुंबईतील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी आणि अतिवेगवान प्रवासासाठी सागरी सेतू आणि सागरी किनारा मार्ग बांधण्यात येत आहे. पालिकेकडून प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल-वांद्रे वरळी-वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंत सागरी सेतू बांधण्यात येत आहे, तर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू बांधत आहे. या सागरी सेतूचा वर्सोवा-विरार आणि पुढे पालघर असा विस्तार एमएमआरडीएकडून करण्यात येणार होता. यासाठी एमएमआरडीएकडून आराखडा तयार केला जाणार होता. असे असताना पालिकेने वर्सोवा ते दहिसर, भाईंदर असा २२ किलोमीटरचा आणि १६ हजार ६२१ कोटी रुपये खर्चाचा सागरी किनारा मार्ग बांधण्याचा निर्णय घेत यासाठीची कार्यवाही सुरू केली आहे.

पालिकेच्या या सागरी किनारा मार्गामुळे वर्सोवा-विरार सागरी सेतूची आवश्यकता नाही. यामुळे एकाच परिसरात दोन प्रकल्प होणार असल्याने राज्य सरकारने वर्सोवा-विरार सागरी सेतू प्रकल्पात बदल करण्याची सूचना केली होती. त्यानुसार एमएमआरडीएने वर्सोवा-विरार सागरी मार्गाऐवजी उत्तन, भाईंदर-विरार असा सागरी सेतू बांधण्याचा प्रस्ताव तयार केला. पालिकेचा सागरी मार्ग भाईंदरला जिथे संपेल तिथून एमएमआरडीएच्या सागरी सेतूला सुरुवात होणार आहे. उत्तन, भाईंदर-विरार अशा सागरी सेतूचा नवा प्रस्ताव एमएमआरडीएने राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला होता.

आणखी वाचा-मुंबई : बेस्ट बसची आजपासून अटल सेतूवरून धाव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्या टप्प्यात विरार-पालघर सागरी सेतूचे काम

एमएमआरडीएच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता वर्सोवा-विरार सागरी सेतू रद्द झाला. आता या जागी उत्तन, भाईंदर-विरार असा सागरी सेतू बांधण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. पहिल्या टप्प्यात उत्तन, भाईंदर-विरार आणि दुसऱ्या टप्प्यात विरार-पालघर असे सागरी सेतूचे काम केले जाणार आहे.