मुंबई निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार मतदार याद्यांच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेतील शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी आहे. शाळा सुरू होताच निवडणूकीच्या कामाला जुंपल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याची तक्रार शिक्षकवर्गातून होऊ लागली आहे. मात्र या कामासाठी स्थानिक मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ) कार्यालयात रुजू होण्याची आवश्यकता नसल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेतील शिक्षण विभागात कार्यरत शिक्षकांच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक (बीएलओ सुपरवायझर) म्हणून नेमणुका करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांनी व शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र शिक्षकांनी दैनंदिन कामकाजावर परिणाम न होऊ देता तसेच मूळ आस्थापनेतून कार्यमुक्त न होता, पूर्णवेळ कार्यालयात उपस्थित राहूनच निवडणुकीशी संबंधित कामे ऑनलाइन पद्धतीने करणे आवश्यक आहे, असे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे. मुंबई महापालिकेतील २१०० शिक्षकांना मतदार याद्यांचे काम देण्यात आले आहे.
शिक्षकांनी ऑनलाईन पद्धतीने काम करावे ….
मात्र नेमणूक करण्यात आलेल्या शिक्षकांनी मुळ कार्यालयातून कार्यमुक्त न होता त्यांनी पूर्णवेळ कार्यालयात उपस्थित राहूनच ऑनलाइन पद्धतीने निवडणुकीचे कामकाज करावयाचे आहे. त्यासाठी स्थानिक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात रुजू होण्याची गरज नाही. तसेच, या कामकाजासाठी आयोगाच्या नियमांप्रमाणे मानधन दिले जाईल, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.
अतिरिक्त शिक्षकांना निवडणुकीचे काम द्या …. शिक्षकांनी या कामाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. रोजची शाळा, प्रवास यातून वेळ काढून ऑनलाईन पद्धतीने काम कधी करायचे असा प्रश्न शिक्षकांनी केला आहे. तर सध्या मुंबईतील खाजगी अनुदानित शाळेतील अनेक शिक्षक ‘अतिरिक्त’ असल्याने त्यांचे वेतन थांबवण्यात आले आहे. अशा सर्व शिक्षकांचे वेतन सुरू करून अतिरिक्त शिक्षकांपैकी जे स्वेच्छेने निवडणूक कर्तव्य स्वीकारण्यास इच्छुक आहेत, त्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी शिक्षक परिषदेचे शिवनाथ दराडे यांनी केली आहे.