|| मंगल हनवते, लोकसत्ता
मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) स्थानकाची निविदा काही दिवसांपूर्वी रद्द करण्यात आल्यामुळे या प्रकल्पाचे मुंबईतील काम रखडले असतानाच, याचा फटका मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) महत्त्वाकांक्षी अशा आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्रकल्पालाही बसला आहे.
वांद्रे-कुर्ला संकुलात बुलेट ट्रेनचे भूमिगत स्थानक उभारण्यात येणार असून त्याच्यावर आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र उभारण्याचे नियोजन आहे. बुलेट ट्रेन स्थानक बांधल्यानंतरच वित्तीय सेवा केंद्राचे काम सुरू करण्यात येईल. मात्र बुलेट ट्रेन स्थानक रखडल्याने सेवा केंद्रालाही विलंब होणार आहे.
वांद्रे-कुर्ला संकुलाचा विकास आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक केंद्र म्हणून करण्यात आला आहे. या आर्थिक केंद्राकडे आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांच्या कार्यालयांना आकर्षित करण्यासाठी, अशी कार्यालये येथे मोठय़ा संख्येने सुरू करण्यासाठी हा प्रकल्प आणण्यात आला आहे. राज्याचा विकास साधणे हा यामागचा उद्देश आहे.
वांद्रे-कुर्ला संकुलात ५० हेक्टर जागेवर जागतिक वित्तीय सेवा केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यापैकी १० हेक्टर जागेची मागणी नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने (एनएचएसआरसीएल) राज्य सरकारकडे केली. ती राज्य सरकारने मान्य केल्याने तसेच हे केंद्र गुजरातला हलविण्याचा प्रयत्न सुरू झाल्याने सेवा केंद्राचा प्रकल्प बारगळला. ‘एमएमआरडीए’ने मात्र हा प्रकल्प मार्गी लावण्याचा निश्चय करून बुलेट ट्रेन स्थानकाच्या वर सेवा केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला. परंतु भूमिगत बुलेट ट्रेन स्थानकाचे काम पूर्ण झाल्यानंतरच सेवा केंद्राचे काम सुरू करता येणार आहे.
आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राबाबत महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांना विचारले असताना त्यांनी, बुलेट ट्रेन स्थानकाचे काम पूर्ण होईपर्यंत थांबण्याशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट केले आहे.
विलंबाचे कारण..
‘एनएचएसआरसीएल’ने बुलेट ट्रेनच्या स्थानकासाठी निविदा प्रक्रिया सुरू केल्याने काम सुरू होण्याची शक्यता होती. मात्र काही दिवसांपूर्वी निविदा रद्द केल्याने स्थानकाचे काम रखडणार आहे. साहजिकच सेवा केंद्रालाही विलंब होणार आहे. त्यामुळे ‘एमएमआरडीए’चीही चिंता वाढली आहे. बुलेट ट्रेन स्थानक मार्गी लागेपर्यंत‘एमएमआरडीए’ला वाट पाहावी लागणार आहे.