मुंबई : मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात शनिवारी दुपारपासून रिलायन्सच्या ‘जिओ’ मोबाईल सेवेचे नेटवर्क ठप्प झाले होते. त्यामुळे दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा वापरणाऱ्या ग्राहकांची मोठी गैरसोय झाली. अनेक ग्राहकांनी समाज माध्यमांवर तक्रारींद्वारे आपला रोष व्यक्त केला.
जिओचे नेटवर्क शनिवारी दुपारी सव्वाबारा वाजल्यापासून बंद झाले होते. तांत्रिक अडचणींमुळे सेवा ठप्प झाल्याचे सांगण्यात येत होते. जिओचे नेटवर्क ठप्प असल्याने दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा बंद झाली. याचा जिओच्या ग्राहकांना मोठा फटका बसला.
फक्त मुंबई, नवी मुंबई, आणि ठाणे या परिसरामधील ग्राहकांनाच या अडचणी येत होत्या. देशात अन्यत्र मात्र नेटवर्क सुरळीत सुरू होते. दुपारी काही काळ नेटवर्क सुरू झाले होते, पण अधूनमधून ते बंद होत होते. त्यामुळे ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत होता.
त्रासाबद्दल दोन दिवस मोफत इंटरनेट सेवा
सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत ग्राहकांना जिओ सेवेत व्यत्यय येत होता. त्यानंतर सर्व सेवा सुरळीत सुरू झाल्या. ग्राहकांना झालेल्या या त्रासाबद्दल दोन दिवसांची अमर्याद ‘इंटरनेट सेवा’ विनामूल्य देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ग्राहकांना यापूर्वी कधीच अशा तांत्रिक अडचणी आल्या नव्हत्या, असे ‘जिओ’तर्फे सांगण्यात आले.