मुंबई : जगभरातील विज्ञान व तंत्रज्ञानप्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या आयआयटी मुंबईच्या ‘टेकफेस्ट’चे २९ वे पर्व डिसेंबरमध्ये पवई संकुलात रंगणार आहे. तत्पूर्वी ‘टेकफेस्ट’ने ‘महाविद्यालयीन सदिच्छादूत’ म्हणजेच ‘कॉलेज अँबेसिडर प्रोग्रॅम २०२५’ या उपक्रमाला अधिकृतपणे सुरुवात केली आहे.
देशभरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संपर्क वाढविणे, विद्यार्थ्यांचे एक जाळे तयार करणे आणि ‘टेकफेस्ट’संदर्भातील इत्यंभूत माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमागील मुख्य उद्देश आहे. कोणत्याही विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना स्वतःच्या महाविद्यालयात आयआयटी मुंबईच्या ‘टेकफेस्ट’चे ‘महाविद्यालयीन सदिच्छादूत’ म्हणून काम करता येणार आहे.
‘टेकफेस्ट’च्या ‘महाविद्यालयीन सदिच्छादूत’ उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना टेकफेस्ट आणि स्वतःच्या महाविद्यालयातील एक दुवा म्हणून काम करावे लागणार आहे. टेकफेस्टमधील विविध स्पर्धा, उपक्रम, कार्यशाळा आदी विविध गोष्टींबाबत विद्यार्थ्यांना माहिती देऊन सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच तंत्रज्ञानाशी निगडित नाविन्यपूर्ण उपक्रम आणि सामाजिक उपक्रमासंदर्भात जनजागृती करावी लागणार आहे.
विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुण, संवाद आणि संघटनात्मक कौशल्ये विकसित करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत ‘टेकफेस्ट’च्या टीमकडून विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. त्यानंतर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रक, भेटवस्तू, शिफारसपत्र देण्यात येणार आहे. तर विशेष बाब म्हणजे ‘टेकफेस्ट’ आणि त्यांच्या भागीदारी संस्थांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधीही मिळणार आहे.
तसेच काही शैक्षणिक प्रमाणपत्र अभ्यासक्रमांवर सवलतही मिळणार आहे, अशी माहिती ‘टेकफेस्ट’ समितीकडून देण्यात आली. ‘टेकफेस्ट’च्या ‘महाविद्यालयीन सदिच्छादूत’ उपक्रमात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना https://ca.techfest.org/ या अधिकृत संकेतस्थळावर अधिक माहिती मिळवता येईल. तसेच नावनोंदणी करून ‘महाविद्यालयीन सदिच्छादूत’ उपक्रमातील सहभाग निश्चित करता येईल. यंदा ‘टेकफेस्ट’ नेमका कोणत्या संकल्पनेवर आधारित असेल आणि अधिकृत तारखांची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.