संसद, राज्य विधिमंडळांमध्ये सदस्यांनी एखाद्या विषयांवर केलेल्या भाषणांचा पुरावा म्हणून वापर करता येत नाही. पण ठाण्यातील परमार बिल्डरच्या आत्महत्याप्रकरणी नगरसेवकांनी सभागृहात केलेल्या भाषणांचा आधार घेण्यात येत आहे. म्हणजेच लोकप्रतिनिधींनी सभागृहात बोलू नये, अशी सत्ताधारी भाजपची आणि ठाण्याच्या पोलिसांची भूमिका आहे का, असा सवाल राष्ट्रवादीने केला आहे. राजकीय सूडबुद्धीने या घटनेची चौकशी करण्यात येत असल्याचा आरोपही राष्ट्रवादीने केला आहे.

एखाद्या शहरात अनधिकृत बांधकामे होत असल्यास नगरसेवकांकडून आवाज उठविला जातो. परमार नावाचा बिल्डर ठाण्यात अनियमित कामे करीत होता. त्या विरोधात आवाज उठविला म्हणून नगरसेवकांना गोवण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला. पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि नगरसेवक नजीब मुल्ला हे एका कंपनीत भागीदार आहेत. कंपनीचे पैसे आव्हाड यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आले होते. पैसे चार भागीदारांमध्ये वाटण्यात आले होते, पण केवळ आव्हाड यांचेच नाव सरकारी वकिलाने न्यायालयात घेतले. आव्हाड यांना या प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोपही मलिक यांनी केला. भाजपच्याच नगरसेविकेचे मंगळसूत्र चोरटय़ांनी खेचले. ठाण्यात दररोज दागिने लुटण्याचे प्रकार घडतात. याला आळा घालण्यात ठाण्याच्या पोलिसांना यश आलेले नाही.