मुंबई : दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत मंगळवारी ऊर्जानिर्मिती क्षेत्रात ५० हजार कोटींच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला. विविध कंपन्यांनी तीन दिवसांत राज्य सरकारशी एकूण सुमारे ८० हजार कोटींचे करार केले. ऊर्जा निर्मितीसाठी ५० हजार कोटी गुंतवणूक करण्यासाठी ‘रिन्यू पॉवर’ कंपनीने राज्य सरकारशी करार केला. कंपनीचे संचालक सुमंत सिन्हा यावेळी उपस्थित होते. याद्वारे राज्यात दहा ते १२ हजार मेगावॉट वीजनिर्मिती होणार आहे. तसेच वेदांता ग्रुपचे संचालक अनिल अग्रवाल आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी लागणाऱ्या बॅटरीसंबधी अमर राजा ग्रुपचे संचालक जय गल्ला यांच्याशी यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उर्जामंत्री नितीन राऊत उपस्थित होते.

दरम्यान,  राज्य सरकारने राज्यातील दुर्गम भागांतील शाळांमध्ये आणि मुंबईतील महापालिका शाळांमध्ये डिजिटल सामग्रीसाठी बायजूसशी सामंजस्य करार केला़  याप्रसंगी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल, सचिव (शालेय शिक्षण) रणजित सिंग देओल व बायजूसचे संस्थापक बायजू रवींद्रन व दिव्या रवींद्रन उपस्थित होते. शिवाय राज्याने जागतिक ग्रीन बिल्डिंग कौन्सिलशी ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी, राज्याला शून्य उत्सर्जन लक्ष्य साध्य करण्यास मदत करण्यासाठी सहकार्य करारावर स्वाक्षरी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशीष कुमार सिंह, अति. मुख्य सचिव ( उद्योग ) बलदेव सिंह, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़  पी. अनबलगन, सहमुख्य कार्यकारी अधिकारी पी.डी. मलिकनेर आणि महाव्यवस्थापक (पणन व जनसंपर्क) अभिजित घोरपडे हे स्वाक्षरी करणाऱ्या कंपन्यांच्या उद्योग प्रतिनिधींसह उपस्थित होते.