मुंबई : नागरिकांना दिवाळी, नाताळच्या सुट्टीत बाहेरगावी जाण्याचे वेध लागतात. सलग सुट्ट्यांमध्ये अनेक जण कुटुंबासह पर्यटनाचे बेत आखतात. ही बाब विचारात घेऊन इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडने (आयआरसीटीसी) पर्यटकांसाठी खास हिवाळ्यात मुंबईतून हवाई सहलीचे नियोजन केले आहे. ऑक्टोबर – डिसेंबरदरम्यान भारतातील विविध ठिकाणच्या पर्यटनस्थळी सहलींच्या योजना आखल्या आहेत.
आयआरसीटीसीच्या मुंबई येथील पश्चिम विभागीय कार्यालयाने हिवाळ्यासाठी खास देशांतर्गत हवाई सहलींची घोषणा केली आहे. भारतातील उत्तरेकडील व पश्चिमेकडील धार्मिक, निसर्गरम्य, सांस्कृतिक व पर्यटनस्थळांचा त्यात समावेश आहे. कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घ्यायचा असेल, धार्मिक स्थळांना भेट द्यायची असेल किंवा एकट्याने साहसी प्रवास करायचा असल्यास आयआरसीटीसीने नियोजित केलेल्या सहलीचे आरक्षण करावे. हिवाळ्यातील पर्यटनासाठी वाढती मागणी लक्षात घेता, लवकरात लवकर आरक्षण करण्याचे आवाहन आयआरसीटीसीतर्फे करण्यात आले आहे.
परतीच्या विमान प्रवासाचा खर्च, उत्तम राहण्याची व्यवस्था, नाश्ता, जेवण, स्थानिक पर्यटनासाठी वाहन खर्च, सर्व प्रवेश शुल्क, प्रवासी विमा आणि अनुभवी आयआरसीटीसीचे मार्गदर्शक व सर्व कर हे आयआरसीटीसीने निश्चित केलेल्या शुल्कात समाविष्ट आहे. या दौऱ्याविषयीची अधिक माहिती आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, आरक्षणाचीही सुविधा याच संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
पर्यटकांचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि आनंददायक बनवण्याचे उद्दिष्ट आहे. पर्यटन स्मरणात राहावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या नवीन योजनांमुळे पर्यटकांना आरामदायक, किफायतशीर व उत्कृष्ट प्रवासाच अनुभव मिळेल, असे इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडचे (आयआरसीटीसी) पश्चिम विभागाचे मुंबईचे समुह महाव्यवस्थापक गौरव झा यांनी सांगितले.
व्हायब्रंट सौराष्ट्र (३ रात्री / ४ दिवस)
प्रस्थान – २५ ऑक्टोबर, २० नोव्हेंबर, २४ डिसेंबर २०२५, २९ जानेवारी २०२६
स्थळ – सासनगीर, सोमनाथ, द्वारका
पॅकेज किमत – २८,००० रुपये प्रति प्रवासी
रॉयल राजस्थान (८ रात्री / ९ दिवस)
प्रस्थान : २७ ऑक्टोबर, १० नोव्हेंबर, १५ डिसेंबर २०२५, २४ जानेवारी २०२६
स्थळ – बिकानेर, जयपूर, जैसलमेर, जोधपूर, उदयपूर
पॅकेज किमत – ५७,३०० रुपये प्रति प्रवासी
आसाम आणि मेघालय (६ रात्री / ७ दिवस)
प्रस्थान – २६ ऑक्टोबर २०२५; २४ जानेवारी २०२६
स्थळ – चेरापुंजी / गुवाहाटी / काझीरंगा / मावलिनॉन्ग / शिलाँग
पॅकेज किमत – ६४,५०० रुपये प्रति प्रवासी (डबल शेअरिंग)
नाताळ, नवीन वर्ष विशेष – रण कच्छ व भुज (३ रात्री / ४ दिवस)
प्रस्थान – २४, २५, ३०, ३१ डिसेंबर २०२५
स्थळ – व्हाइट रण – ढोलावीरा व भुज
पॅकेज किमत – ४१,५०० रुपये प्रति प्रवासी
वाराणसी व अयोध्या (६ रात्री / ७ दिवस)
प्रस्थान – ९ नोव्हेंबर, २७ डिसेंबर २०२५, २४ जानेवारी, २८ फेब्रुवारी, २९ मार्च २०२६
स्थळ – वाराणसी / प्रयागराज / अयोध्या / लखनऊ
पॅकेज किमत – ४९,२०० प्रति प्रवासी (डबल शेअरिंग)