मुंबई : शिवसेनेबरोबर युती होवो वा न होवो, राज्यात लोकसभेच्या ४० जागा जिंकू, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असला तरी काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी, सरकारच्या विरोधातील नाराजी, युती तुटल्यास होणारे मतविभाजन यामुळे भाजपसाठी हे आव्हान सोपे नाही, असे मानले जाते. अगदी युती झाली तरीही सध्याच्या राजकीय परिस्थितीत गतवेळ एवढेच यश मिळविणे कठीणच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लातूरमध्ये झालेल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज्यात लोकसभेच्या ४० जागा जिंकण्याचा निश्चय करण्यात आला. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत भाजप-शिवसेना-स्वाभिमान शेतकरी संघटनेची युती असताना ४२ जागा जिंकल्या होत्या. तेव्हा भाजप २३, शिवसेना १८, तर राजू शेट्टी हे निवडून आले होते. उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक जागा असलेल्या महाराष्ट्रातूनही चांगल्या खासदारांच्या संख्याबळाची भाजपला अपेक्षा आहे. खासदारांचे संख्याबळ चांगले असावे म्हणूनच भाजपने शिवसेनेपुढे मैत्रीचा हात पुढे केला होता. पण शिवसेनेकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यानेच भाजप अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेनेच्या विरोधात सूर लावला. ‘पहारेकरी चोर आहे’ हे मोदी यांना उद्देशून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेले विधान भाजपला फारच जिव्हारी लागले आहे. लोकसभेच्या ४० जागाजिंकण्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांचे मनोधैर्य उंचाविण्यास फायदा होईल. पण राष्ट्रवादी व काँग्रेसची आघाडी, भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढल्यास हिंदुत्ववादी मतांमध्ये फूट पडू शकते. हे भाजपलाच त्रासदायक ठरू शकते.

शिवसेना पोकळ धमक्या आणि इशाऱ्यांना कधीच घाबरत नाही. शिवसेनेचे काळीज हे वाघाचे आहे. शिवसेना चांगले यश मिळवेल.

  – खासदार संजय राऊत, शिवसेना प्रवक्ते

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: It is a challenge for the bjp to fight election alone in maharashtra
First published on: 08-01-2019 at 03:00 IST