मुंबई : मनोरुग्ण हा कुटुंबासाठी काही वेळा डोकेदुखी ठरत असला तरी,अशा रुग्णांसाठी ठाणे मनोरुग्णालय कायमच आधारवड ठरताना दिसत आहे. आईने सोडलं… भावाने नाकारलं… पण ठाणे मनोरुग्णालयाने मात्र अखेरच्या श्वासापर्यंत साथ दिली. एका ९६ वर्षीय आजींचं नुकतंच निधन झालं. त्यांच्या आयुष्यात कधी कुणी साथ दिली नसेल, पण जिथं त्यांना ‘मनोरुग्ण’ म्हणून सोडलं गेलं त्या ठाणे मनोरुग्णालयानेच त्यांना कुटुंबासारखं तब्बल ६० वर्षे जपलं.
ही कहाणी तशी खूप जुनी म्हणजे १९६५ सालची. तब्बल ६० वर्षांपूर्वी, कल्याण न्यायालयाच्या आदेशानुसार या सखूबाई आजीला तिच्या आईने ठाणे मनोरुग्णालयात दाखल केलं. पण त्यानंतर ना आई परत आली, ना भाऊ, ना कुठलाच नातेवाईक. रुग्णालयाने वेळोवेळी नातेवाईकांचा शोध घेतला. खूप शोधाअंती सखुबाईच्या भावाशी संपर्क झाला तेव्हा त्याने थेट सांगितलं की “मी तिला दाखल केलं नाही, त्यामुळे मी घेऊन जाणार नाही.” त्यानंतर या आजीचे कोणतेच नातेवाईक कधीही त्यांची विचारपूस करण्यसाठी आले नाहीत असे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.
गेली ६० वर्षे त्या ठाणे मनोरुग्णालयातच रहात आहेत. तेच त्यांचे घर आणि आयुश्य बनले आहे. त्यांचे सारे विश्व मनोरुग्णालयाच्या चार भिंतीआडच गेले. वयाच्या ३६ व्या वर्षी त्यांना त्यांच्या आईने मनोरुग्णालयात दाखल केले. दरम्यानच्या काळात त्यांनी वेगवेगळ्या आजारांचाही सामना केला. या सर्वकाळात रुग्णालयातील परिचारिका, डॉक्टर यांनी त्यांची योग्य ती काळजी घेतल्यामुळे ९६ वर्षांचे आयुश्य त्यांना लाभले. २००८ पासून उच्च रक्तदाब, त्यानंतर हायपर थायरॉईड, डोळ्यांचं अंधत्व… शरीर हरवत गेलं, पण त्या आजींचं मन खंबीर होत. वॉर्ड क्रमांक १२ हे त्यांच घर झाल होत. त्या स्वतःची कामं शक्य तितकी स्वतः करत. इतर रुग्णांशी संवाद साधत, प्रेमाने बोलत. त्यांच्या डोळ्यांनी पाहणं थांबवलं, पण मन मात्र नेहमी जाग असल्याचे तेथील कर्मचारी सांगतात.
ठाणे मनोरुग्णालयाने केली ६० वर्षे सेवा
आजच्या जगात एवढ दीर्घायुश्य लाभण हे कठीणच पण आजी ९६ वर्षे जगल्या. मनोरुग्णालयाच्या सर्व टीमने त्यांच्या स्वतःच्या आजीप्रमाणे त्यांंची सुश्रुषा केली. सर्व स्टाफने त्यांची घेतलेली काळजी व देखभाल यामुळे त्यांना इतके दीर्घायुष्य लाभले असावे. आजकाल खाजगी रुग्णालयातही भरमसाठ पैसे देऊनही अशी काळजी घेतली जात नाही अशावेळी ठाणे मनोरुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी एखाद्या रुग्णाची इतक्या छान प्रकारे काळजी व देखभाल केल्याचे हे उदाहरण दुर्मिळ म्हणावे लागेल.
रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली या आजीची देखभाल सुरूच होती. त्यांच्या उपचारासाठी डॉ. रुचा जोशी, डॉ. शमा राठोड, डॉ. शोभना चव्हाण, डॉ. निशा तडवी, डॉ. वृषाली चव्हाण, डॉ. कल्पना माले डॉ प्रज्ञा बराळ यांनी सातत्याने उपचार दिले परिसेविका रीना वासुदेव . परिचारिका सुमन गोरडे, प्रमिला भिरुड, कविता गावित, वॉर्ड सेविका भारती कुरकुटे, संगीता कोकरे यांनी त्यांचं तितक्याच ममतेने संगोपन केलं. समाजसेवा अधीक्षक निलीमा केसरकर आणि ब्रह्मदेव जाधव यांनी नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांना रुग्णाला घरी घेऊन जाण्याबाबत, वारंवार पाठपुरावा समुपदेशन व मार्गदर्शन केले. परंतु शेवटपर्यंत नातेवाईकांनी प्रतिसाद दिला नाही, असे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.
जेव्हा त्यांची प्रकृती खालवली तेव्हा पुन्हा एकदा भावाला कळवण्यात आलं. मात्र “मृतदेह घ्यायला येणार नाही. देहदान करा किंवा जे करायचं ते करा असे भावाने सांगितले. परिणामी रुग्णालय प्रशासनाने ज्यांना ६० वर्षं जपल त्या सखुबाई आजींना शेवटपर्यंत साथ देत वागळे इस्टेट पोलीस स्टेशनच्या सहकार्याने अंत्यसंस्कार केले गेले.
या रुग्णांशी आमचे रक्ताचे नातं नसेल तरी मनाच्या धाग्यांनी जोडलेलं खरं नातं म्हणजे सेवा, स्नेह आणि सहवासाचं. ठाणे मनोरुग्णालयाचे आमचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी सर्वच रुग्णांना चांगली सेवा देण्याचे काम करतात असे ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालये वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांनी सांगितले. शक्यतो बरे झालेल्या मानसिक रुग्णांना त्यांच्या कुटुंबाकडे परत पाठविण्याचा आमचा प्रयत्न असतो. तथापि बहुतेक प्रकरणात पत्ता बदलेला असतो अथवा नातेवाईक नेण्यास तयार नसतात असेही डॉ मुळीक म्हणाले.