नायक केंद्रस्थानी असलेल्या चित्रपटात पडद्यावरती कमीतकमी दृश्यांतून दिसूनही प्रेक्षकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेणे हे खूपच आव्हानात्मक आहे. ‘हिम्मतवाला’ या चित्रपटाद्वारे हिंदीच्या रूपेरी पडद्यावर पदार्पण करताना ते आव्हान पेलण्याचा प्रयत्न आपण केला आहे, असे दाक्षिणात्य चित्रपटातील अभिनेत्री तमन्ना भाटिया हिने सांगितले.
१९८० च्या दशकात जीतेंद्रच्या गाजलेल्या ‘हिम्मतवाला’ चित्रपटाचा त्याच नावाचा रिमेक दिग्दर्शक साजिद खानने बनविला असून या चित्रपटाद्वारे  मूळची सिंधी परंतु दाक्षिणात्य चित्रपटांतील अभिनेत्री तमन्ना हिंदीच्या रूपेरी पडद्यावर नायिकेच्या भूमिकेत झळकणार आहे. शंभर कोटी क्लबचा सुपरस्टार अजय देवगणसोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल विचारले असता, सुपरस्टारसोबत काम करण्याचे फायदेच आहेत, तोटे काहीच नाहीत. कारण सुपरस्टारमुळे मोठय़ा प्रमाणावर प्रेक्षक चित्रपटगृहांत चित्रपट पाहायला जातील हा सगळ्यात मोठा फायद्याचा मुद्दा आहे. सुपरस्टारचा चित्रपट असला तरी नायिका म्हणून माझे अभिनय गुण दाखविण्याची मला संधी आहे. कमी दृश्य आपल्यावर चित्रीत झाली असली तरी लोक पाहतील आणि चित्रपट आवडला की नाही ते ठरवतील, असे प्रांजळ मत तमन्नाने व्यक्त केले.
तद्दन बॉलीवूड मसाला चित्रपटांमध्ये नायक आणि नायिकांचा वापर केला जातो असे म्हटले जात असताना तमन्ना म्हणाली की एका अभिनेत्रीसाठी अस्सल व्यावसायिक चित्रपट करणे हे अधिक आव्हानात्मक असते कारण मर्यादित दृश्ये आपल्यावर चित्रीत होत असली तरी त्यामधील आपल्या अभिनय गुणांद्वारे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्याचे मोठे आव्हान पेलायला मिळते. त्यामुळे ते खूप महत्त्वाचे ठरते, असे ठाम मत तमन्नाने मांडले आहे.
एका कलावंताचे काम हे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्याचे असते. आपल्या अभिनयातून त्यांना भूमिकेत गुंतवून ठेवण्याचे काम कलावंताचे असते. म्हणून चित्रपट निवडताना कोणत्याही कलावंताने प्रेक्षकांच्या अभिरुचीचा, त्यांच्या आवडी-निवडीचा विचार करायला हवा, असेही तमन्ना म्हणाली. हिम्मतवाला हा मसाला ‘एण्टरटेनर’ चित्रपट आहे. दिग्दर्शक साजिद खान आणि सुपरस्टार अभिनेता अजय देवगण यांच्या चित्रपटांना सातत्याने प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे हा चित्रपटही लोकांना आवडेल, असा विश्वास तिने व्यक्त केला.
शेवटी चित्रपट हे ‘टीमवर्क’ आहे. चित्रपटाची टीम चांगली असेल तर एकत्रित चांगल्या पद्धतीने काम केले तर चित्रपट चांगला बनतो हेच खरे, असेही तिने सांगितले.