मुंबई : राज्यातील तरुणांना रोजगारक्षम बनविण्यासाठी आयटीआयकडून प्रयत्न सुरू असून, त्याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या पाचवर्षांमध्ये मुली मोठ्या प्रमाणावर आयटीआय अभ्यासक्रमांना प्रवेश घेत आहेत. राज्यामध्ये खास महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या १५ आयटीआयमध्ये पाच वर्षांमध्ये १६ हजार १९२ विद्यार्थीिनींनी प्रवेश घेतला असून, यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्स, माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान सिस्टिम मेन्टेनन्स, कम्प्युटर ऑपरेटर्स आणि प्रोग्रॅम असिस्टंट अशा अभ्यासक्रमांना विद्यार्थीिनीकडून अधिक पसंती देण्यात येत आहे.
राज्यात छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, मुंबई, ठाणे,रत्नागिरी, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, नाशिक, जळगाव, पुणे शहर, सोलापूर, अमरावती आणि अकोला या १५ जिल्ह्यांमध्ये मुलींसाठी खास प्रत्येकी एक आयटीआय आहे. राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे (डीईव्हीटी) या आयटीआयमध्ये विविध अभ्यासक्रम राबवले जातात. या १५ आयटीआयमध्ये मिळून साधारण ३८०० जागा आहेत. या जागांवर मागील पाच वर्षांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनीच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. पाच वर्षांमध्ये या आयटीआयमधून जवळपास १६ हजार १९२ विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला आहे. आयटीआयमध्ये २००० साली २,७४६ विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला होता. त्यानंतर दरवर्षी आयटीआयमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या संख्येत वाढ होत आहे. आयटीआयमध्ये २०२१ मध्ये ३२५८, २०२२ मध्ये ३४१०, २०२३ मध्ये ३४९२ आणि २०२४ मध्ये ३२८६ विद्यार्थिनींनी प्रवेश घेतले आहेत.
आयटीआयला प्रवेश घेणाऱ्या या विद्यार्थिनींचा सर्वाधिक कल हा अभियांत्रिकीशी संबंधित अभ्यासक्रमाकडे आहे. त्यातही इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्स, कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅम असिस्टंट, इलेक्ट्रिशियन या अभ्यासक्रमांना जास्त पसंती आहे. या अभ्यासक्रमांसाठी प्रत्येक आयटीआयमध्ये उपलब्ध असलेल्या जागांपैकी सुमारे ९५ टक्के जागा दरवर्षी भरल्या जात असून प्रवेशासाठी चुरस असल्याचे निदर्शनास आले आहे.
गेल्या पाच वर्षांतील आकडेवारी
वर्ष | उपलब्ध जागा | प्रवेश | टक्केवारी |
२०२० | ३८४० | २७४६ | ७१ |
२०२१ | ३९८८ | ३२५८ | ८१ |
२०२२ | ३९५६ | ३४१० | ८६ |
२०२३ | ३८५२ | ३४९२ | ९० |
२०२४ | ३७७६ | ३२८६ | ८७ |
एकूण | १९,४१२ | १६,१९२ | ८३ |