मुंबई : सुलेखन कलेला वाहून घेतलेल्या ‘लेटर्स एन स्पिरीट’ या कलाप्रेमी समूहातर्फे ‘अनबाउंड’ हे सुलेखन चित्रांचे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी येथे १६ ते २२ सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात १६ कलाकारांच्या सुलेखन चित्रकृती पाहता येणार आहेत. हे प्रदर्शन सर्व कलाप्रेमी नागरिकांना सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत विनामूल्य पाहता येणार आहे.
तत्पूर्वी, सदर प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवार, १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता राज्याच्या कला संचालनालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे आणि प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
अच्युत पालव यांच्या मार्गदर्शनाखाली २०१५ साली ‘लेटर्स एन स्पिरीट’ हा सुलेखन कलेला वेगळा आयाम देणारा कलासमूह मनिष कासोदेकर, निलेश देशपांडे, विनय देशपांडे आणि शिरीष शिरसाट (सुलेखन शिरीष) या चार मित्रांनी स्थापन केला. सुलेखनाच्या मूळ स्वरूपाला धक्का न लावता त्या कलेचे वेगवेगळे कलाविष्कार कसे विकसित करता येतील, या उद्देशाने हा समूह गेली १० वर्षे काम करीत आहे. या समूहात निलेश जाधव, अशोक हिंगे, बी. जी. लिमये, कुलदीप कारेगावकर आदी नामवंत चित्रकार मंडळी यात कार्यरत आहेत.
प्रयोगशीलता हाच मूळ गाभा पकडून सुलेखनाचे वेगवेगळे प्रयोग ‘लेटर्स एन स्पिरीट’ समूहातर्फे केले जातात. साहित्य आणि सुलेखन यांची सांगड घालत नामवंत साहित्यिकांच्या कृती आकर्षक स्वरूपात नवीन पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न त्यांनी गो. नि. दांडेकर यांच्या साहित्यावर आधारित एका दिनदर्शिकेने सुरू केला. त्यानंतरच्या काही वर्षात पु. ल. देशपांडे, आरती प्रभू आणि गुलजार यांच्या साहित्यावर आधारित तीन कॉफी टेबल पुस्तके प्रकाशित करण्यात आली. या वेगळ्या प्रयोगांना रसिकांकडूनही अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. या पार्श्वभूमीवर ‘लेटर्स एन स्पिरीट’ समूहाच्या १६ कलाकारांच्या सुलेखन चित्रकृतींचे ‘अनबाउंड’ हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.