मुंबई : पश्चिम रेल्वेवरील जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये गोळीबार केल्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाच्या जवान चेतन सिंह याची ध्वनिचित्रफीत वायरल झाली होती. या ध्वनिचित्रफितीतील आवाज व बोलणारा व्यक्ती चेतन सिंहच असल्याची पडताळणी न्यायवैधक प्रयोगशाळेकडून करण्यात आली आहे. त्यानंतरच याप्रकरणी भादंवि १५३(अ) अंतर्गत धार्मिकद्वेष निर्माण केल्याप्रकरणी कलम वाढवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
आरोपी चेतन सिंहने केलेल्या गोळीबारात आरपीएफ अधिकारी टिकाराम मीना (५८), अब्दुल कादरभाई मोहम्मद हुसैन भानपूरवाला (४८), अख्तर अब्बास अली (४८) यांच्यासह हैदराबादच्या नामपल्ली विभागातील रहिवासी सैयद सैफुल्लाह यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चेतन सिंहविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन सिंह असगर याच्या मृतदेहाच्या शेजारी उभे राहून धार्मिक द्वेष पसरवत असल्याची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली होती. या ध्वनिचित्रफितीच्या सत्यतेबाबत तसेच त्यातील आवाज आरोपी चेतन सिंहचाच असल्याबाबत पडताळणी करण्यात आली आहे. त्यासाठी चेतन सिंहच्या आवाजाचे नमुने तसेच छायाचित्रे न्यायवैधक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होती.
ध्वनिचित्रफितीचे रासायनिक विश्लेषण करून पडताळणी करण्यात आली. तसेच त्याची पडताळणी करण्यासाठी उपस्थित प्रत्यक्षदर्शीचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत. या चित्रफितीची सत्यता पडताळल्यानंतर याप्रकरणी धार्मिक विद्वेष पसरवल्याप्रकरणी आरोपीविरोधात १५३(अ) कलम वाढवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.