मुंबई : आफ्रिकेतील चिम्पांझींवर केलेल्या संशोधनाद्वारे जगाची दृष्टी बदलण्याचे अतिशय मोलाचे काम करणाऱ्या ज्येष्ठ निसर्ग, पर्यावरण, प्राणी अभ्यासक डॉ. जेन गुडाल यांचे वयाच्या ९१व्या वर्षी निधन झाले. ‘जेन गुडल इन्स्टिट्यूट’ने बुधवारी (१ ऑक्टोबर) त्यांच्या निधनाची माहिती दिली. अमेरिकेतील व्याख्यान मालिकेसाठी गुडाल कॅलिफोर्नियात होत्या.
डॉ. गुडाल यांनी चिम्पांझींवरच्या विविधांगी संशोधनावर केंब्रिजमधून ‘पीएच.डी.’ मिळवली होती. डॉ. संयुक्त राष्ट्र परिषदेने २००२मध्ये त्यांच्या नावाची घोषणा शांतीदूत म्हणून केली. त्यांच्या या बहुविध कार्यासाठी त्यांना प्रतिष्ठेचा ‘टेम्पलटन’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ‘टेम्पलटन’ पुरस्कार विज्ञान व अध्यात्म यांची सांगड घालणाऱ्या वैज्ञानिकांना दिला जातो.
डॉ. गुडाल यांचा जन्म १९३४ मध्ये लंडन येथे झाला, नंतर त्या १९५७ मध्ये केनियाला गेल्या, तेथे त्यांना प्राणिसृष्टीची प्राथमिक ओळख झाली. मानववंशशास्त्रज्ञ व जीवाश्मशास्त्रज्ञ लुई लिकी यांच्या निमंत्रणावरून त्यांनी १९६०मध्ये चिम्पांझीवर संशोधन सुरू केले. त्यांनी चिम्पांझींचा अभ्यास आणि संरक्षण यासाठी १९७७मध्ये ‘जेन गुडाल इन्स्टिट्यूट’ स्थापन केली. निसर्ग व मानव यांच्यातील एक दुवा म्हणून काम करताना त्यांनी ६५ देशात पर्यावरण प्रकल्प राबवले आहेत.
गुडाल यांनी गोम्बेतील चिम्पांझीवर संशोधन केल्यानंतर, सर्वच माकडे शाकाहारी नाहीत, असा निष्कर्ष काढला. त्यांनी चिम्पांझींच्या टोळ्यांचे युद्ध पाहिले. टोळीवर सत्ता मिळवण्यासाठी एकमेकांचे लचके तोडणारे चिम्पांझी त्यांनी पाहिले होते. त्यांचे विविध लेखन सर्वसामान्यांपर्यंतही पोहोचले होते.
मुंबई दौरा
‘जेन गुडाल इन्स्टिट्यूट-इंडिया’ या संस्थेने आयोजित केलेल्या ‘होप ग्लोबल टूर’अंतर्गत डॉ. गुडाल गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये मुंबई दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट देऊन वन कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधला होता.
जेन गुडाल यांनी मानवता आणि आपली पृथ्वी यांच्यासाठी एक असामान्य वारसा मागे सोडला आहे. – अँटोनियो गुटेरेस, सरचिटणीस, संयुक्त राष्ट्रे
जेन गुडाल यांनी आपला प्राण्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलला. प्राण्यांच्या हक्कांच्या मुद्द्यावर आम्हाला त्यांचा पाठिंबा नेहमी मिळाला. – इन्ग्रिड न्यूकर्क, संस्थापक, ‘पेटा’
त्यांनी शांतपणे आणि समर्पितपणे आपले म्हणणे मांडले. पृथ्वीवरील जीवांना असणाऱ्या धोक्याबद्दल त्या नेहमी बोलल्या. त्यांचे काम हेच त्यांचे जीवन होते. – ख्रिस पॅकहॅम, पर्यावरणवादी
जेन गुडाल यांनी ६५ वर्षांपेक्षा जास्त काळ काम करून आपली जग आणि त्यामधील आपले स्थान याच्या समजुतीमध्ये मूलभूत बदल घडवले. त्यांनी जगभरातील तरुणांना कुतुहल, करुणा आणि समर्पणाची प्रेरणा दिली. – मेलिंड फ्रेंच गेट्स, मानवतावादी कार्यकर्त्या
प्राण्यांच्या संरक्षणाच्या मुद्द्यावर गुडाल यांचा प्रभाव अथांग आहे. प्रायमेट आणि सर्व प्राण्यांसाठी त्यांनी केलेले काम कधीही विसरता येणार नाही. – किटी ब्लॉक, अध्यक्ष, ‘ह्युमेन वर्ल्ड फॉर ॲनिमल्स’