जिओच्या नेटवर्कमध्ये शनिवारी (५ फेब्रुवारी) काही तांत्रिक दोषांमुळे अडथळे आले. त्यामुळे मुंबईसह काही भागातील जिओ ग्राहकांचा सेवा ठप्प झाली. यानंतर काही वेळातच हा तांत्रिक दोष दुरुस्त करून सेवा सुरळीत करण्यात आली. मात्र, ग्राहकांना काही काळासाठी झालेल्या या त्रासाबद्दल जिओने हटके स्टाईलने माफी मागितली आहे. तसेच अडथळ्याला सामोरं जावं लागलेल्या भागातील ग्राहकांना २ दिवस अनलिमिटेड डाटा देण्याची घोषणा केली. इतकंच नाही, तर प्रत्येक ग्राहकाला याबाबत व्यक्तिगत मेसेज करून माहिती देण्यात आली.

जिओने आपल्या ग्राहकांना पाठवलेल्या मेसेजमध्ये म्हटलं, “प्रिय जिओ ग्राहक, तुमच्या सेवेच्या गुणवत्तेला आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे. आज सकाळी दुर्दैवाने तुमची आणि मुंबईतील काही इतर ग्राहकांची सेवा खंडीत झाली. त्यांना काही अडथळ्यांचा सामना करावा लागला. आमच्या टीमने नेटवर्कबाबतचा हा तांत्रिक अडथळा काही तासातच दूर केला. मात्र, हा काळ नक्कीच सुखद नसणार हे आम्ही समझू शकतो. त्यासाठी आम्ही तुमची माफी मागतो.”

हेही वाचा : भारतीयांचा ऑनलाईन प्रवास सुसाट होणार; वर्षभरात देशात 5G सेवा सुरू करणार!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आम्ही तुमच्या मोबाईल क्रमांकावर २ दिवसांसाठी अमर्याद डाटा प्लॅन विनाशुल्क उपलब्ध करून देत आहोत. आज रात्रीपासून तो लागू होईल. हा निशुल्क प्लॅन तुमच्या वर्तमान प्लॅनची वैधता संपल्यानंतर आपोआप सुरू होईल. तुमच्या सेवेच्या अनुभवाला सर्वोच्च महत्त्व देण्याला आमचं प्राधान्य आहे. जिओकडून तुम्हाला सप्रेम,” असंही या संदेशात कंपनीने म्हटलं आहे.