राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘हरहर महादेव’ या चित्रपटातील काही प्रसंग आणि संवादावर गंभीर आक्षेप घेतले आहेत. “हरहर महादेव चित्रपटात पहिली विकृती म्हणजे बाजीप्रभू देशपांडे शिवाजी महाराजांना अरेतुरे बोलताना दाखवण्यात आले आहे,” असा आरोप आव्हाडांनी केला. तसेच शिरवळला बायकांचा बाजार भरत असत, असं चित्रपटात दाखवण्यात आलंय, असाही आक्षेप त्यांनी नोंदवला. जितेंद्र आव्हाड रविवारी (१३ नोव्हेंबर) एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “हरहर महादेव चित्रपटात पहिली विकृती म्हणजे बाजीप्रभू देशपांडे शिवाजी महाराजांना अरेतुरे बोलताना दाखवण्यात आले आहे. हे शक्य नाही. बाजीप्रभुंची शिवाजी महाराजांप्रती किती मोठी निष्ठा होती आणि शिवाजी महाराजांना बाजीप्रभूंविषयी किती आदर होता हे इतिहासात आहे, सर्वांना माहिती आहे. जेधे-बांदल हे प्रामाणिक देशमुख होते. त्यांच्यात वाद दाखवण्यात आला. त्यांची बदनामी करण्यात आली.”

“मराठा समाजाचे लोक बायकांचा बाजार कधी भरवत होते?”

“शिवकालीन इतिहास सांगणाऱ्या बखरी आणि नोंदींच्या उलटी बाजू सिनेमात दाखवण्यात आली. मी दोनच प्रकरणं सांगतो. शिरवळला बायकांचा बाजार भरत असत, असं चित्रपटात दाखवण्यात आलंय. एकतर शिरवळ ज्या नदीच्या काठी आहे तिथून बायका इंग्लंडला न्यायच्या असतील तर कृष्णेत जाऊन, श्रीलंकेला उलटी फेरी मारून बंगालमार्गे इंग्लंडला जावे लागेल. ते कसे जाणार होते देवास ठावूक. मात्र, हा बाजार कुठे भरवला जात होता, मराठा समाजाचे लोक कधी बाजार भरवत होते हे दाखवलेलं नाही,” असा आक्षेप जितेंद्र आव्हाड यांनी घेतला.

“मराठ्यांना थोडं कमी लेखण्याचा प्रयत्न केला”

“या चित्रपटात मराठी आणि मराठा वेगळं करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच मराठ्यांना थोडं कमी लेखण्याचा प्रयत्न केला आहे,” असाही आरोप आव्हाडांनी केला.

“अफजल खानाची माहिती बाजीप्रभुंनी दिल्याचं चित्रपटात दाखवलं”

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, “अफजल खानाची सर्व माहिती बाजीप्रभू देशपांडेंनी दिली असं चित्रपटात दाखवण्यात आलं. मात्र, हे कोणत्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिलं आहे. शिवाजी महाराज जेव्हा अफजल खानाला मारतात तेव्हा अफजल खानाला कसं मारलं हे डोळे बंद केलं की महाराष्ट्राच्या समोर येतं. भेटीच्यावेळी अफजल खान मिठी मारताच शिवाजी महाराजांच्या पाठीवर वार करतो, शिवाजी महाराज वाघनख्यांनी त्याचा कोथळा बाहेर काढतात.”

“शिवाजी महाराज कृष्णाजी कुलकर्णीचं मुंडकं उडवतात”

“तेवढ्यात कृष्णाजी कुलकर्णी शिवाजी महाराजांवर हल्ला करतो. तेव्हा शिवाजी महाराज त्याचं मुंडकं उडवतात. मात्र, आता चित्रपटात शिवाजी महाराज दोन खांब लाथेने तोडतात, अफजल खान १० फूट वर उडतो आणि शिवाजी महाराजांच्या मांडीवर पडतो, त्यानंतर शिवाजी महाराज त्याचं पोट फाडतात, असं दाखवण्यात आलं आहे. ही काय मस्करी आहे,” असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी आक्षेप घेतले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad object scene of bajiprabhu deshpande from har har mahadev movie pbs
First published on: 13-11-2022 at 20:01 IST