मुंबई : शहरातील शाळा व शिक्षण संस्थांना धमकीच्या ई-मेलचे सत्र सुरू असताना कांदिवली पश्चिम येथील शाळेलाही धमकीचा ई-मेल प्राप्त झाला आहे. याबाबतच माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शाळेत सर्वत्र शोध मोहीम राबवली. त्यावेळी काहीही संशयीत सापडले नाही. दरम्यान, संबंधित ई-मेल मुंबई बाहेरून पाठवण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
मुंबईतील कांदिवली परिसरातील शाळेला शुक्रवारी धमकीचा ई-मेल आला. त्याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर बॉम्बशोधक व नाशक पथकाच्या मदतीने शाळेत सर्वत्र तपासणी करण्यात आली. पण काहीही संशयास्पद सापडले नाही. याप्रकरणामागे खोडसाळपणा असल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखाही चौकशी करीत असून प्राथमिक तपासणीत ई-मेल मुंबई बाहेरून पाठवण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.
मुंबईतील शिक्षण संस्थांना धमक्यांचे सत्र सुरूच असून गेल्या दोन महिन्यांत ११ आंतरराष्ट्रीय शाळा व शैक्षणिक संस्थांना धमक्यांचे ई-मेल प्राप्त झाले आहेत. धमकीच्या ई-मेलसाठी स्वीडन, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, नॉर्वेमधील व्हीपीएनचा वापर करण्यात आला आहे. मुंबईतील शाळांना धमकीचे ई-मेल पाठवल्याप्रकरणी आतापर्यंत पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पण प्रत्यक्षात मे व जून या दोन महिन्यांत ११ आंतरराष्ट्रीय शाळा व शैक्षिणक संस्थांना धमकीचे ई-मेल आले आहेत. त्यात डोंबिवलीतील एक शाळा आणि पवईतील नामांकीत शिक्षण संस्थेचा समावेश आहे.
आरोपीने धमक्यांच्या ई-मेलमध्ये मुंबईवर हल्ला करणारा अजमल कसाब, संसंदेवर हल्ला करणारा अफजल गुरू, तसेच हैदराबाद येथील बलात्कार प्रकरणाचाही उल्लेख केला आहे. त्यात आरडीएक्स, तसेच बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिली आहे. सर्व ई-मेलमधील मजकूर सारखाच आहे. आरोपीने ई-मेल पाठवण्यासाठी बहुतांशी परदेशी व्हीपीएनचा वापर केला आहे. त्यात नॉर्वे, ऑस्टेलिया, स्वीडन, अमेरिका या देशांच्या व्हीपीएनचा समावेश आहे. काही ई-मेलमध्ये दिल्लीतील व्हीपीएनचा वापर करण्यात आला आहे. काही प्रकरणांमध्ये आऊटलुक ई-मेल आयडीचा वापर करण्यात आला आहे.