मुंबई : मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि’मेलो मार्गाला जोडणाऱ्या कर्नाक उड्डाणपुलाचे काम पूर्ण होत आले असून १० जूनपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा मुंबई महापालिकेचा प्रयत्न आहे. तसेच मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलही पूर्ण होत आला असून हा पूल जून महिन्यात खुला करण्यात येणार आहे.
पश्चिम उपनगरातील अंधेरी येथील गोखले पुलाचे काम पूर्णत्वास आल्यानंतर आता मुंबई महापालिका प्रशासनाने कर्नाक पूल आणि विक्रोळी पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यावर भर दिला आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पूल विभागाच्या समन्वयाने कर्नाक पूल आणि विक्रोळी पुलाची उभारणी, स्थापत्य कामे व अनुषंगिक कामांची कालमर्यादा निश्चित केली. बांगर यांनी गेल्या आठवड्यात या दोन्ही पुलांच्या कामांची पाहणी केली.
मध्य रेल्वेने धोकादायक घोषित केल्यामुळे कर्नाक पुलाची पुनर्बांधणी मुंबई महानगरपालिकेने केली. मशीद बंदर परिसरात पूर्व आणि पश्चिम परिसर जोडणारा हा पूल अत्यंत महत्ताचा आहे. पुलाची लांबी रेल्वेच्या हद्दीत ७० मीटर, तर पूर्व बाजूला (पी डि’मेलो मार्ग) १५५ मीटर, पश्चिम बाजूला (मोहम्मद अली मार्ग) २५५ मीटर इतकी आहे. कर्नाक पुलाच्या दोन्ही बाजूंचे पोहोच मार्ग पूर्ण झाले आहेत. एकूणच पुलाचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. रंगरंगोटी, दिशादर्शक फलक, विद्युत खांब, थर्मोप्लास्ट, कॅट आईज आदी कामे हाती घेण्यात आली आहेत. ही सर्व कामे १० जूनपर्यंत पूर्ण करण्यात येतील. सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर व कोणताही अवरोध नसेल त्यावेळी पुलाची ताकद, स्थिरता आणि सुरक्षितता तपासण्यासाठी भार चाचणी घेण्यात येईल, अशी माहिती अभिजीत बांगर यांनी दिली.
विक्रोळी पूलामुळे प्रवासाचा वेळ ३० मिनिटांनी कमी होणार
पूर्व उपनगरातील विक्रोळी येथील रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या या उड्डाणपुलामुळे विक्रोळी पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि पूर्व परिसरातील पूर्व द्रुतगती महामार्ग जोडले जाणार आहेत. या उड्डाणपुलामुळे प्रवासाचा वेळ सुमारे ३० मिनिटांनी कमी होणार आहे. विकोळी उड्डाणपुलाची पूर्व दिशेची सर्व कामे पूर्ण झाली आहेत. पश्चिम दिशेकडील मास्टिक अस्फाल्टचे काम सुरू आहे. पश्चिम दिशेस पूल लाल बहादूर शास्त्री मार्गास जेथे मिळतो, त्या ठिकाणी उतार मोठा आहे. या ठिकाणी काँक्रिट भराव टाकून तो भाग उंच करण्यात आला आहे. जेणेकरून खोलगट भागात वेगाने येणाऱ्या वाहनांचा संभाव्य अपघात टाळता येईल. ३१ मेपर्यंत पुलाची सर्व कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही बांगर यांनी सांगितले.
कर्नाक पुलाच्या कंत्राटदाराला १ कोटी ८० लाखाचा दंड
कर्नाक पुलाच्या पोहोच रस्त्यासाठी लागणारे गर्डर म्हणजेच तुळई ३० एप्रिलपर्यंत येणार होते. ते न आल्यामुळे १ व २ मे रोजी कंत्राटदाराला दरदिवशी १० लाख रुपये दंड करण्यात आला होता. त्यानंतरही गर्डर आणण्यात तो अपयशी ठरल्यामुळे त्याला गर्डर येईपर्यंत दरदिवशी २० लाख रुपये दंड करण्यात आला होता. १० मे रोजी गर्डर आल्यानंतर तातडीने पुढील कामे करण्यात आली. दहा दिवसांच्या विलंबासाठी कंत्राटदाराला १ कोटी ८० लाख रुपये दंड करण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.