मुंबई : मुंबईला २०३० पर्यंत रेबीजमुक्त करण्यासाठी महानगरपालिकेने विविध उपक्रम हाती घेतले आहे. त्याअंतर्गत महापालिकेतर्फे रेबीज लसीकरण सुविधेसाठी १६३ आरोग्य संस्थांमध्ये अँटी-रेबीज लसीकरण केंद्रे उपलब्ध करण्यात आली आहेत. त्यात वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सर्वसाधारण रुग्णालय, महानगरपालिका दवाखाना, आपला दवाखाना आदींचा समावेश आहे. तसेच, एकूण ७० ठिकाणी सायंकाळच्या वेळी लसीकरणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. दरम्यान, रेबीज रुग्णांसाठी कस्तुरबा रुग्णालयात विशेष कक्ष उभारण्यात आला आहे.
‘मुंबई रेबीज निर्मूलन मोहीम’ हा महानगरपालिका व मिशन रेबीज यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेला एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. मुंबईला २०३० पर्यंत रेबीजमुक्त करण्याचा संकल्प महानगरपालिकेने सोडला असून त्यानिमित्ताने जनजागृती मोहिमा, आरोग्य शिक्षण सत्रे आणि लसीकरण मोहिमा राबविण्यात येत आहेत. वर्ष २०२३ पासून आतापर्यंत १ लाखांहून अधिक श्वानांचे लसीकरण करण्यात आले आहे. यासाठी जीपीएस ट्रॅकिंग व डब्ल्यूव्हीएस ॲपसारख्या डिजिटल साधनांचा वापर केला जात आहे. जागतिक रेबीज दिनाच्या औचित्याने २००७ पासून जागतिक स्तरावर रेबिज प्रतिबंधात्मक लसीकरणाचे आयोजन केले जाते. यंदाच्या वर्षाचे घोषवाक्य: ‘ॲक्ट नाऊ: यू, मी, कम्युनिटी’ हे आहे. रेबीज प्रतिबंध हा फक्त एखाद्या संस्थेचा किंवा गटाचा विषय नसून, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक भागधारक आणि संपूर्ण समाजाने मिळून करावयाचा प्रयत्न आहे. या मोहिमेमध्ये समाजातील सर्व घटकांनी सहभाग आणि योगदान द्यावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी यांनी केले.
या आजाराबाबत शाळा व लोकवस्ती स्तरावरील उपक्रमांद्वारे १ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना आणि ७५,००० समुदाय सदस्यांना रेबीज प्रतिबंध, श्वान चावल्यावर तात्काळ घ्यावयाची काळजी आणि जबाबदार पाळीव प्राणीपालन याविषयी शिक्षण देण्यात आले आहे. तसेच, पालिकेतर्फे रेबीज प्रतिसाद पथक व श्वान नियंत्रण युनिटद्वारे चाव्याच्या घटनांची चौकशी व रिंग व्हॅक्सिनेशन करण्यात येत आहे. भटक्या प्राण्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी श्वानांसह मांजरींचे शस्त्रक्रियेद्वारे निर्बीजकरण करण्यात येत आहे.
श्वान चावल्यावर घ्यावयाची काळजी
- जखम साबण व स्वच्छ पाण्याने १५ मिनिटे धुवा.
- हळद, तेल, चुना इत्यादी काहीही लावू नये.
- वैद्यकीय सल्ल्यानुसार अँटी-रेबीज लसीकरण पूर्ण करा.
- गंभीर चाव्याच्या घटनांमध्ये जवळच्या महानगरपालिका रुग्णालयातील आपत्कालीन उपचार विभागात दाखल करा.
- अपरिचित वा भटक्या प्राण्यांपासून दूर रहा.
- पाळीव प्राण्यांना नियमितपणे लस द्या.
- डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लसीकरण पूर्ण करावे.
उच्च-धोका गटांसाठी ‘प्री-एक्स्पोजर प्रोफिलॅक्सिस’
पशुवैद्यक, श्वान पकडणारे कर्मचारी, प्रयोगशाळा कर्मचारी व स्वयंसेवी संस्थांचे कर्मचारी यांना नियमित प्री-एक्स्पोजर प्रोफिलॅक्सिस’ लसीकरणाची सुविधा महानगरपालिकेच्या ठराविक दवाखान्यात उपलब्ध करण्यात येणार आहे.
रेबीज १०० टक्के टाळता येण्यासारखा आजार
रेबीज आजार हा झूनॉटिक आजारांपैकी एक असून सर्वसामान्यतः श्वानामार्फत हा आजार संक्रमित होतो. रेबीज आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास हा आजार पूर्णपणे, १०० टक्के टाळता येण्यासारखा आहे. दरवर्षी २८ सप्टेंबर रोजी ‘वर्ल्ड रेबीज डे’ साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट रेबीजविषयी जनजागृती करणे आणि ‘वन हेल्थ’ दृष्टिकोनातून या रोगाच्या नियंत्रणातील प्रगती अधोरेखित करणे, असे आहे.