दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्याच्या मुद्द्यावरून गुरुवारी विधानसभेत गोंधळ झाल्यामुळे सभागृहाचे कामकाज बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. अखेर शुक्रवारी या मुद्द्यावरून कृतज्ञता प्रस्ताव मांडण्याची सूचना करण्यात आली आणि ती विरोधकांनी मान्य केल्यामुळे सभागृहात निर्माण झालेला पेच मिटला. मुंडेंच्या योगदानाबद्दल कृतज्ञता प्रस्तावाच्या माध्यमातून सदस्य आपल्या भावना मांडणार आहेत.
मुंडे यांचे मंगळवारी नवी दिल्लीत अपघाती निधन झाले. त्याचदिवशी विधीमंडळात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली होती. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शोकप्रस्ताव मांडला आणि त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनीही शोक व्यक्त केला. मात्र, त्यादिवशी विरोधी पक्षातील नेते सभागृहात उपस्थित नव्हते. त्यामुळे विरोधकांकडून या प्रस्तावावर कोणीच काही बोलले नव्हते.
गुरुवारी सकाळी कामकाज सुरू झाल्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांनी मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकप्रस्ताव सादर करण्याची मागणी केली. देवेंद्र फडणवीस, बाळा नांदगावकर यांच्यासह अन्य सदस्यांनी त्यांना अनुमोदन दिले. मात्र, मुंडे यांना सभागृहाकडून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. पुन्हा नव्याने शोकप्रस्ताव नको, अशी भूमिका विधीमंडळ कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मांडली. त्याला विरोधी पक्षाच्या सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला. त्यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. विधानसभेत गुरुवारी अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्यपालांच्या अभिभाषणावरही चर्चा होणार आहे. याच दोन विषयांना प्राधान्य देण्याची मागणी हर्षवर्धन पाटील यांनी अध्यक्षांकडे केली. त्यानंतर अध्यक्षांनी शोकप्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी गटनेत्यांची बैठक घेण्याची सूचना करीत सभागृहाचे कामकाज एक तासासाठी तहकूब केले. त्यानंतर गट नेत्यांची बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत शोकप्रस्तावाऐवजी कृतज्ञता प्रस्ताव मांडण्याची सूचना करण्यात आली आणि ती विरोधकांनी मान्य केली.