लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : घाटकोपर येथील २००२ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी ख्वाजा युनूसच्या कथित कोठडी मृत्यूप्रकरणी माफीचा साक्षीदार होण्याच्या बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अर्जाला तपास यंत्रणेने शुक्रवारी सत्र न्यायालयात विरोध केला. माफीचा साक्षीदार झाल्यानंतर वाझे यांच्यातर्फे गुन्ह्याशी संबंधित पूर्ण सत्य उघड केले जाणार नाही आणि त्यांच्याकडून न्यायालयाची दिशाभूल करण्याची शक्यता आहे, असा दावा तपास यंत्रणेने त्यांच्या मागणीला विरोध करताना केला.
पोलिसांनी प्रतिज्ञापत्र दाखल करून वाझे यांचा माफीचा साक्षीदार होण्याचा अर्ज फेटाळण्याची मागणी केली. वाझे हे या प्रकरणी जामिनावर बाहेर असले तरी अन्य गंभीर प्रकरणांत ते सध्या कारागृहात आहेत. या प्रकरणी देण्यात आलेल्या विविध आदेशांना वाझे यांनी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे, माफीचा साक्षीदार झाल्यानंतर त्यांच्याकडून न्यायालयाची दिशाभूल करण्याची शक्यता आहे, असेही पोलिसांनी न्यायालयाला सागितले. तपास यंत्रणेविरोधात आरोप करण्याची वाझे यांना सवय आहे, असा दावाही तपास यंत्रणेने त्यांच्या माफीचा साक्षीदार होऊ देण्याच्या मागणी अर्जाला विरोध करताना केला.
आणखी वाचा-राज्यभर ११ हजारांहून अधिक घरे पडून, म्हाडाच्या शिल्लक घरांची खासगी संस्थेमार्फत विक्री
दरम्यान, या कथित कोठडी मृत्यूप्रकरणात आपला सहभाग असल्याचे किंवा युनुसच्या मृतदेहाची ओळख पटल्याचे पोलिसांनी कुठेही नमूद केलेले नाही. त्यामुळे, या प्रकरणी आपल्याला माफीचा साक्षीदार होऊ देण्याची मागणी वाझे यांनी अर्जाद्वारे न्यायालयाकडे केली आहे. हे प्रकरण २० वर्षांपासून न्यायप्रविष्ट असून त्याचा त्रास आपल्याला सहन करावा लागत आहे. हा केवळ न्यायीक प्रक्रियेचा गैरवापर नाही, तर त्यामुळे आपल्या समाजातील प्रतिमा आणि प्रतिष्ठेला धक्का पोहोचत असल्याचा दावाही वाझे यांनी अर्जात केला आहे. वाझे यांच्यासह चार पोलिसांवर या प्रकरणी खटला दाखल आहे.