मुंबई : कोल्हापूरात उच्च न्यायालयाचे सर्किट खंडपीठ कार्यान्वित करण्यास मंजुरी मिळाली असून मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्या. आलोक आराधे यांच्या नावे त्याबाबतची अधिसूचना शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार, येत्या १८ ऑगस्टपासून कोल्हापूर येथील सर्किट खंडपीठ कार्यान्वित होणार आहे.या निर्णयामुळे जवळपास चार दशकापासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर, औरंगाबाद आणि गोवा या तीन खंडपीठांमध्ये आता कोल्हापूर येथील सर्किट पीठाचा समावेश होणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना राज्यपालांच्या संमतीने शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आली.
उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठ स्थापनेच्या अनुषंगाने खंडपीठ कृती समितीने यावर्षी मार्च महिन्यात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्ये यांच्यासह उच्च न्यायालयाच्या अन्य प्रशासकीय न्यायमूर्तींची भेट घेतली होती. त्यावेळी, कोल्हापूर येथे सर्किट खंडपीठ स्थापन झाल्यास कोल्हापूरसह जवळच्या जिल्ह्यातील आणि तालुक्यांतील पक्षकारांना होणारा फायदा, न्यायदान या विषयांवर कृती समिती आणि मुख्य न्यायमूर्तीमध्ये चर्चा झाली होती.
सरन्यायाधीशांचीही या खंडपीठाच्या बाजूने भूमिका
न्यायालयीन प्रक्रियेच्या विकेंद्रीकरणाच्या बाजूने आपण कायम राहू, कोल्हापूर येथे खंडपीठ स्थापनेसही आपले संपूर्ण समर्थन असल्याची स्पष्ट भूमिका सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी काही दिवसांपूर्वी मांडली होती. या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. कोल्हापूर खंडपीठाचा सहा जिल्ह्यांना फायदा कोल्हापूर खंडपीठामुळे कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर या सहा जिल्ह्यांना फायदा होणार आहे.