मुंबई : गेल्या दोन दशकात कोकण रेल्वेवरील प्रवासी संख्या, रेल्वेगाड्या आणि स्थानकाची संख्या वाढली. मात्र कोकण रेल्वेचे दुहेरीकरण प्रलंबित असल्याने, कोकण रेल्वे प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होतो. प्रवाशांचा प्रवास अवेळी होत असल्याने, त्यांच्यातून नाराजीचा सूर कायम उमटत असतो. यासाठी कोकण रेल्वेवर दुहेरीकरण करण्याची चर्चा होत होती. परंतु, कोकण रेल्वे मार्गावर दुहेरीकरणाचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोकणवासीयांचे वाढीव रेल्वेगाड्या, थांब्यांचे स्वप्न स्वप्नच राहणार आहे.

भारतीय रेल्वेत कोकण रेल्वेचे विलीनीकरण करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जाते. तसेच नुकताच कर्नाटक राज्यातील काही खासदार एकत्र येऊन त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन, या विषयाबाबत चर्चा केली. परंतु, अद्याप ठोस निर्णय झाला नाही. तर, दुसरीकडे कोकण विकास समितीचे सदस्य अक्षय महापदी यांनी नुकताच माहिती अधिकाराखाली विचारलेल्या प्रश्नातून धक्कादायक उत्तरे मिळाली आहे. महापदी यांनी १२ नोव्हेंबर २०२४ कोकण रेल्वेचे दुहेरीकरणाबाबत माहिती विचारली. त्यानुसार दुहेरीकरणाबाबत कोणताही प्रस्ताव नसल्याचे ल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. फक्त कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागात रोहा ते वीर ४६.८ किमीपर्यंत रेल्वे मार्गाचे ऑगस्ट २०२१ रोजी दुहेरीकरण पूर्ण झाले. तर, अन्य भागात टप्पा दुहेरीकरण किंवा पूर्ण दुहेरीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही, असे दोन वेळा रेल्वेकडून स्पष्ट केले आहे.

हेही वाचा…पर्यावरणाचे नियम धाब्यावर, कांदिवलीतील विकासकाला पुन्हा नोटीस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संपूर्ण देशभरातील रेल्वेचे दुहेरीकरण, तिहेरीकरण, चौपदरीकरण केले जात आहे. मात्र कोकण रेल्वेचा दुहेरीकरण करण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. कोकण रेल्वेचा पसारा हा रोहा ते ठोकुर अशा ७४० किमी अंतरापर्यंत पसरलेला आहे. मात्र रोहा ते वीर मार्ग वगळता अन्यत्र दुहेरीकरणाची कामे झाली नाहीत. परिणामी, कोकण रेल्वेची वाढत्या गर्दीला सामावून घेण्याची क्षमता कमी होऊ लागली आहे. मुंबईस्थित कोकणवासियांचे कोकणात जाताना प्रचंड हाल होतात. तर, उशिरा रेल्वेगाड्या धावणे, जादा रेल्वेगाड्या नसणे, मर्यादित स्थानकांना थांबा असणे, अवेळी विशेष रेल्वेगाड्या चालवणे अशा समस्यांना प्रवाशांना सामोरे जावे लागते. तसेच, कोकणातील अनेक गावांचा विकास करण्यासाठी अतिरिक्त स्थानके उभारण्याची मागणी आहे. याबाबत महापदी यांनी विचारले असता, अतिरिक्त स्थानके उभारण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे माहिती अधिकारातून उत्तर देण्यात आले.