मुंबई : गणेशत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या काही नियमित गाडय़ांचे आरक्षण काही तासांत फुल्ल झाले. यंदा २ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरूवात होत असून २९ ऑगस्टच्या सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या एक्सप्रेसमधील स्लीपर श्रेणीची प्रतिक्षा यादीचे तिकीट आरक्षण बुधवारी फुल्ल झाले. त्यामुळे प्रवाशांना या गाडीच्या स्लीपरचे आरक्षण उपलब्ध होऊ शकले नाही. तेजस एक्सप्रेस सोडता कोकण मार्गावरील अन्य गाडय़ांचे आरक्षण फुल्ल होत आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना यंदाही मोठय़ा प्रतिक्षा यादीचा सामना करावा लागणार आहे.

दरवर्षी गणेशोत्सवासाठी मुंबईतून मोठय़ा संख्येने दोन ते तीन दिवस आधीच गणेशभक्त कोकणात जातात. कुटूंबियासह जाताना प्रवास सुकर व्हावा यासाठी नियमित गाडय़ांचे काही महिने आधीच आरक्षण करतात. परंतु आरक्षणाला सुरूवात होताच मोठय़ा प्रतिक्षा यादीचा सामना करावा लागतो. सिटींग, स्लीपर श्रेणीत प्रतिक्षा यादी असतानाही त्यात अनेक प्रवासी आपल्या कुटूंबियांसह उभ्याने प्रवास करतात. त्यामुळे दिलासा देण्यासाठी रेल्वेकडून नियमित गाडय़ांबरोबरच  विशेष गाडय़ादेखील सोडल्या जातात. परंतु त्यातही प्रतिक्षा यादीच येते.

यंदा २ सप्टेंबरपासून गणरायाचे आगमन होत आहे. त्यामुळे दोन ते तीन दिवस आधीच कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांकडून नियमित गाडय़ांच्या आरक्षणाला मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे.

झाले काय?

बुधवारी सकाळी आरक्षणाला सुरूवात होताच २९ ऑगस्टच्या कोकणकन्या एक्स्प्रेसच्या स्लीपर श्रेणीची प्रतिक्षा यादी ५०० च्याही वर गेली. त्यामुळे प्रतिक्षा यादीचेही आरक्षण मिळणे बंद झाले. दुपारनंतर हीच यादी ४५२ पर्यंत पोहोचली. तरीही प्रवाशांना या श्रेणीचे तिकीट उपलब्ध झाले नाही. याच गाडीच्या वातानुकूलित थ्री टियर श्रेणीचे तिकीटही १५० च्या वर पोहोचले होते. २९ ऑगस्टचे दादर ते मडगाव जनशताब्दी गाडीच्या सेकंड सिटींगचीही प्रतिक्षा यादी १९० पर्यंत पोहोचली होती. तर वातानुकूलित चेयर कारची प्रतिक्षा यादी ३४ पर्यंत होती. मडगावपर्यंत जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेसच्या स्लीपर श्रेणीचेही आरक्षण १०० च्या वर, तर सेकंड सिटींगसाठी ७० च्या वर यादी आली होती. दादर ते तिरुनेलवेल्ली या गाडीचे मडगावपर्यंतच्या स्लीपर श्रेणीचे २९ ऑगस्टचे आरक्षणही फुल्ल झाले होते.