कोकण व मध्य रेल्वे या दोन्ही मार्गावर डबरडेकर गाडीची यशस्वी चाचणी गेल्या आठवडय़ातच पूर्ण झाली. आता आठवडाभरात आरडीएसओ या चाचणीचा अहवाल कोकण व मध्य रेल्वे प्रशासनाला सादर करणार आहे. त्यानंतर हा अहवाल मान्यतेसाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे जाईल. मात्र रेल्वे सुरक्षा आयुक्तांची परवानगी ही केवळ औपचारिक बाब असल्याने या गणपतीत चाकरमानी डबलडेकरने गावाकडे जाण्याची शक्यता आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस ते रोहा आणि कोकण रेल्वेमार्गावर कोलाड ते मडगाव या स्थानकांदरम्यान डबलडेकर गाडीची चाचणी यशस्वी झाली. या मार्गावरील बोगदे, पूल, वळणे याचा कोणताही अडसर गाडीला आला नाही. प्लॅटफॉर्मच्या उंचीचाही प्रश्न नसल्याचे आढळले आहे.
आरडीएसओचा अहवाल कोकण व मध्य रेल्वे तो रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांच्याकडे देतील. रेल्वे सुरक्षा आयुक्तांना एखाद्या मुद्दय़ाबाबत अडचण वाटल्यास ते पुन्हा चाचणी करण्याची शक्यता आहे. मात्र बव्हंशी ही गाडी लवकरच धावेल. दरम्यान, जुलै महिन्यात रेल्वेचा अर्थसंकल्प मांडला जाणार असून या अर्थसंकल्पातही या गाडीची घोषणा होण्याची शक्यता आहे, असे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तसेच रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी मान्यता दिल्यानंतर रेल्वे बोर्डाकडून या नव्या गाडीची घोषणा केली जाणार आहे.
असे असले, तरी सुरक्षा आयुक्तांच्या मान्यतेनंतर मध्य रेल्वे विशेष गाडी म्हणून ही गाडी गर्दीच्या मोसमात या मार्गावर चालवू शकते. गणपतीच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा विचार करून मध्य रेल्वे ही गाडी त्या वेळी विशेष गाडी म्हणून चालवण्याचा विचार करत आहे, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 28th May 2014 रोजी प्रकाशित
गणपतीत डबलडेकरने गावाक् चला!
कोकण व मध्य रेल्वे या दोन्ही मार्गावर डबरडेकर गाडीची यशस्वी चाचणी गेल्या आठवडय़ातच पूर्ण झाली. आता आठवडाभरात आरडीएसओ या चाचणीचा अहवाल कोकण व मध्य रेल्वे प्रशासनाला सादर करणार आहे.

First published on: 28-05-2014 at 01:49 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Konkan railway to run double decker ac train in ganesh festival