कोकण रेल्वे भारतीय रेल्वेचा स्वतंत्र विभाग (डिव्हिजन) कधीच होऊ शकत नाही, असे स्पष्टीकरण रेल्वे बोर्डाचे सदस्य सुबोध जैन यांनी केले. कोकण रेल्वेमार्गाची देखभाल करणारी ‘कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड’ ही काही प्रमाणात सरकारी नियंत्रण असलेली खासगी कंपनी आहे. अशी कंपनी ही बाजारातील चढउतारांवर अवलंबून असते. त्यामुळे कोकण रेल्वेला भारतीय रेल्वेतील एका विभागाचा दर्जा देता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड या खासगी कंपनीद्वारे कोकण रेल्वेमार्ग बनवण्यात आला. अशी कंपनी वर्षांतून फक्त एकदाच सरकारला उत्तर देण्यास बांधील असते. मात्र त्यातील दैनंदिन कामकाजावर सरकारचे काहीच नियंत्रण नाही. या कंपनीत अनेकांची गुंतवणूक आहे. मात्र सध्या कोकण रेल्वेला फायदा नाही. त्यामुळे गुंतवणूक केलेल्यांचेच पैसे सुटत नाहीत, असे लक्षात आले आहे. त्यामुळे अशा कंपनीचे उत्तरदायित्त्व सरकारी यंत्रणा घेऊ शकत नाही, असे जैन यांनी सांगितले.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीमध्ये गुंतवणुकीतील मोठा वाटा बाजारातून आला आहे. यात सामान्य लोकांपासून काही मोठय़ा कंपन्यांपर्यंत अनेकांचे पैसे गुंतले आहेत. या सर्वाना त्यांचे पैसे परत करण्याची जबाबदारी सरकार उचलू शकत नाही, असे जैन यांनी स्पष्ट केले. त्यामुळेच कोकण रेल्वेला भारतीय रेल्वेमध्ये समाविष्ट करता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.
या कंपनीवर सध्या असलेले अल्प सरकारी नियंत्रणच पुढे कायम राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.